उपराजधानीत डेंग्यूचा प्रकोप
By admin | Published: October 19, 2014 12:57 AM2014-10-19T00:57:10+5:302014-10-19T00:57:10+5:30
मागील काही दिवसांपासून शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांमधील ही भीती कमी व्हावी, आणि त्यांना डेंग्यू आजार नेमका काय आहे आणि त्या आजारात
अशी घ्या काळजी : आरोग्य विभागाने सुचविल्या उपाययोजना
नागपूर : मागील काही दिवसांपासून शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांमधील ही भीती कमी व्हावी, आणि त्यांना डेंग्यू आजार नेमका काय आहे आणि त्या आजारात काय उपाययोजना कराव्यात, यासंबंधी थोडक्यात माहिती सादर करीत आहोत. डेंग्यू हा विषाणूज्वर (व्हायरल डिसीज) आहे. यावर्षी डेंग्यूने संपूर्ण राज्याला आपल्या विळख्यात घेतले आहे. नागपुरातही मोठ्या प्रमाणावर डेंग्यूची साथ पसरली आहे.
जीवघेणा डेंग्यू
डेंग्यूचे त्वरित निदान होऊन उपचार झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यास ते घातक ठरते. या जीवघेण्या डेंग्यूचे दोन प्रकार आहेत. १) हिमोऱ्हेजिक डेंग्यू ,२) डेंग्यू शॉक
४वेळेवर निदान न झाल्यास हिमोऱ्हेजिक डेंग्यू होण्याची शक्यता असते. दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने ताप राहणे, त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर रुग्णाच्या पोटात आणि व आतड्यांमध्ये रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव हृदयात, यकृत प्लिहा (स्लीन) मेंदूमध्ये होतो. त्याला कंट्रोल करणे डॉक्टरांना शक्य राहत नाही. कमी रक्तदाब झाल्यास रुग्ण शॉकमध्ये जातो आणि मृत्यू पावतो.
घ्यावयाची काळजी
डेंग्यूवर रामबाण औषध नाही. वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार करावा लागतो. परंतु डेंग्यू होऊन नये यासाठी नागरिकांनीच काळजी घ्यावयाची गरज आहे. एडिसी इजिप्ती या डासामुळे डेंग्यू होतो. तेव्हा या डासांची उत्पत्ती रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी घरात आणि परिसरात शक्यतोवर स्वच्छता ठेवावी. परिसरात डबके साचणार नाही याची काळजी घ्यावी, पाण्याचे टाके झाकून ठेवावे, अबेट नावाचे तेल पाण्यावर टाकले तर एडिस इजिप्ती डासाचे अंडे वाढत नाही, त्याचाही वापर करता येईल. आठवड् यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. यादिवशी घरातील टाके, व पाण्याने भरलेले सर्व भांडे रिकामे करावेत. एकूणच स्वच्छतेवर भर द्यावा. त्यामुळे डेंग्यूच्या डासांवर नियंत्रण आणता येईल.
नागपुरातही विषाणूजन्य प्रयोगशाळेची गरज
मेंदूज्वर, डेंग्यू, स्वाईन फ्लू यांसारख्या विषाणूज्वराचे हमखास निदान पुण्याच्या विषाणूजन्य प्रयोगशाळेत केले जाते. राज्यभरातून विविध आजारासाठी नमुने प्रयोगशाळेत पडून असतात. त्यामुळे अहवाल यायला उशीर होतो. अनेकदा तर रुग्ण बरा होऊन घरी गेलेला असतो किंवा त्याचा मृत्यू झाल्यानंतर अहवाल प्राप्त होत असतात. अशा अहवालाचा कुठलाही उपयोग होत नाही. नागपुरातून ज्या रुग्णांचे नमुने तपासाला पुण्याला पाठवले जातात. ते केवळ नागपूरचेच रुग्ण नसून संपूर्ण विदर्भ आणि छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यातीलही असतात. पुण्याहून त्यांचे अहवाल उशिरा येत असल्याने उपचारात उशीर होतो. परिणामी योग्य उपचार होत नाहीत. त्यामुळे पुण्यातील विषाणूजन्य प्रयोगशाळेच्या धर्तीवर नागपुरातही प्रयोगशाळेची गरज आहे. राज्यात स्वाईन फ्लू याआजाराची साथ मोठ्या प्रमाणावर आली होती. तेव्हा नागपुरातील काही खासगी हॉस्पिटलमध्ये निदानाची व्यवस्था करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. डेंग्यू संदर्भातही तशी व्यवस्था करता येऊ शकते.