समृद्धी महामार्गाच्या मोबदल्यात भरीव वाढ
By admin | Published: January 5, 2017 05:17 AM2017-01-05T05:17:13+5:302017-01-05T05:17:13+5:30
नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वेसाठी (समृद्धी महामार्ग) लँड पुलिंग फॉर्म्यूल्याने भूसंपादन करताना मोबदल्यामध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला.
यदु जोशी, मुंबई
नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वेसाठी (समृद्धी महामार्ग) लँड पुलिंग फॉर्म्यूल्याने भूसंपादन करताना मोबदल्यामध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला.
जिरायतीच्या मोबदल्यात जवळच्या टाऊनशिपमध्ये पूर्वीप्रमाणेच २५ टक्के विकसित भूखंड देण्यात येणार असून वार्षिक अनुदान मात्र हेक्टरी ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये केले आहे. ते दहा वर्षांपर्यंत दिले जाईल. बागायतीच्या मोबदल्यात टाऊनशिपमध्ये ३० टक्के विकसित भूखंड देताना १ लाख ५० हजार रुपये वार्षिक अनुदान हेक्टरी दिले जाईल. आधीच्या निर्णयानुसार ते एक लाख रुपये होते. वर्षभरात काही काळ बागायती आणि काही काळ जिरायती असलेल्या शेतजमिनीचा हा घटक असेल. अशा शेतजमिनीचे संपादन केल्यास २५ टक्के विकसित भूखंड टाऊनशिपमध्ये दिला जाईल आणि हेक्टरी १ लाख १२ हजार ५०० रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. तिन्ही प्रकारच्या अनुदानात दरवर्षी १० टक्के वाढ केली जाणार आहे. एकराचा विचार करता जिरायती जमिनीसाठी ३० हजार रु., हंगामी बागायती जमिनीसाठी ४५ हजार रु. तर बागायती जमिनीसाठी एकरी ६० हजार रुपयांचे वार्षिक अनुदान देण्यात येईल. भोगवटादार वर्ग १ आणि २ मधील जमिनी, वनहक्क कायद्याखाली कसण्यासाठी दिलेल्या जमिनी, भूदान कायद्याप्रमाणे संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या मोबदल्याचा फॉर्म्यूलादेखील निश्चित करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गाच्या उभारणीस इच्छुक असलेल्या कंपन्यांकडून राज्य रस्ते विकास महामंडळाने पात्रता विनंती (आरएफक्यू) मागविली आहे. या महामार्गासाठी एकूण खर्च ४६ हजार कोटी रुपये येणार असला तरी प्रत्यक्ष महामार्ग बांधण्यासाठी २७ हजार ६५० कोटी रुपये खर्च येणार असून त्यासाठीच आरएफक्यू मागविले आहेत.