उपनगरीय रेल्वेला मेट्रो, मोनोप्रमाणे संरक्षण
By admin | Published: July 7, 2016 12:39 AM2016-07-07T00:39:35+5:302016-07-07T00:39:35+5:30
मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकाला आता मेट्रो आणि मोनो रेल्वेप्रमाणेच संरक्षण मिळणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनसोबत नुकतीच एक बैठक पार पडली.
- सुशांत मोरे, मुंबई
मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकाला आता मेट्रो आणि मोनो रेल्वेप्रमाणेच संरक्षण मिळणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनसोबत नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत एक हजार सुरक्षा रक्षक कॉर्पोरेशनकडून मिळावेत, यावर चर्चा करण्यात आली. त्यासाठी शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त (लोहमार्ग) मधुकर पाण्डेय यांनी लोकमतशी बोलताना दिली.
उपनगरीय रेल्वे स्थानक आणि हद्दीत होणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण तसेच गुन्ह्यांचा छडा लावण्याची जबाबदारी ही लोहमार्ग पोलीसांवर आहे. तर रेल्वे मालमत्तांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आरपीएफवर आहे. सध्या लोहमार्ग पोलिसांकडे साडे तीन हजार एवढे मनुष्यबळ आहे. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवताना लोहमार्ग पोलिसांची चांगलीच तारांबळ उडते. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांच्या मदतीला होमगार्डही देण्यात आले आहेत. परंतु काही होमगार्ड हे अनेक कारणांमुळे गैरहजर राहतात. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांना काही वेळेला आरपीएफचीही मदत घ्यावी लागते. मात्र पश्चिम आणि मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडेही अपुरे मनुष्यबळ असल्याने आणखी काही सुरक्षा रक्षक मिळावेत, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी मेट्रो आणि मोनोची सुरक्षा असणाऱ्या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनशी बोलणी सुरु केली आणि ५00 सुरक्षारक्षक मिळावेत, असा प्रस्ताव तयार करुन तो शासनाकडे पाठवला. मात्र आता हाच प्रस्ताव नव्याने तयार करुन तो पुन्हा एकदा शासनाकडे पाठवण्याची तयारी लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात येत आहे.
एक आठवड्यापूर्वीच महाराष्ट्र स्टेट
सिक्युरिटी कॉर्पोरेशनसोबत बैठक पार पडली. यात नव्या प्रस्तावानुसार एक हजार सुरक्षा रक्षक मिळण्यासंदर्भात चर्चा झाली. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल.
- मधुकर पाण्डेय
(पोलीस आयुक्त- लोहमार्ग)