मल्लखांबामुळेच अॅथलेटिक्समध्ये यश
By admin | Published: June 28, 2016 03:21 AM2016-06-28T03:21:36+5:302016-06-28T03:21:36+5:30
‘‘सुमारे २५ वर्षांपूर्वी सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत पूरलेल्या मल्लखांबावर प्रात्यक्षिके केली होती.
मुंबई : ‘‘सुमारे २५ वर्षांपूर्वी सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत पूरलेल्या मल्लखांबावर प्रात्यक्षिके केली होती. मल्लखांबाच्या सरावामुळेच अॅथलेटीक्स मध्ये मी यशस्वी होऊ शकले,’’ असे मत आंतरराष्ट्रीय साताऱ्याची अॅथलिट - प्रशिक्षक आणि माजी मल्लखांबपटू स्नेहलता राजपूत यांनी व्यक्त केले. दादर येथील पावसाळी मल्लखांब शिबीर समारोप कार्यक्रमात राजपूत बोलत होत्या.
दादर, शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिरात ३२ व्या समर्थ पावसाळी मल्लखांब शिबीराचा समारोप समारंभ पार पडला. यावेळी अदिती व्होरा, अनघा चव्हाण, प्रणय जळगावकर आणि केतुक पटेल यांना ‘उत्कृष्ट खेळाडू’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे सागर राणे आणि तेजल मुसळे यांना उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी क्रीडा समालोचक अरुण वागळे, निकेतन वैदिक पाठशाळेचे प्रभाकर पवार उपस्थितीत होते. शालांत परीक्षेत ९८.४ टक्के गुण मिळवणाऱ्या समर्थच्या राष्ट्रीय मल्लखांबपटूने मल्लखांबाला पर्याय नाही ही कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. शिबिरात ५ ते ८५ वयोगटांतील सुमारे ३५७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी दादर येथील कमला मेहता अंध शाळेच्या विद्यार्थीनींनी दोरीवरील मल्लखांबाचे चित्तथराराक प्रात्यक्षिके सादर केली. तसेच समर्थच्या मल्लखांबपटूंनीही दिप रोप, हत्यारी मल्लखांब, बाटल्यांवरील मल्लखांबाचे थरारक प्रात्यक्षिके सादर केली. (क्रीडा प्रतिनिधी)
>सकारात्मक विचार करावा...
इतर खेळाच्या प्रशिक्षक, संघटनांनी केवळ क्रिकेटचा नाव ठेवू नये, तर क्रिकेटसारखी लोकप्रियता मिळवण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार करुन त्यानुसार पावले उचलावी. शिवाय आपल्या खेळाचा प्रसार करताना आपण कोठे कमी पडत आहोत, हे जाणून घेत त्याचा सकारात्मक पद्धतीने विचार करावा, असे परखड मत मिलिंद वागळे यांनी व्यक्त केले.