विंचवाच्या दोन नवीन प्रजाती शोधण्यात यश; ‘कायरोमॅचिट्स रामदासस्वामी’ अशी नावे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 12:48 AM2020-10-16T00:48:05+5:302020-10-16T00:48:15+5:30
वन्यजीव संशोधकांची माहिती : ‘कायरोमॅचिट्स पराक्रमी’
नितीन भावे
खोपोली : पुणेस्थित इनहर (इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्टरी एज्युकेशन अँड रिसर्च) या वन्यजीव संशोधन व संवर्धनाला वाहिलेल्या संस्थेच्या संशोधकांनी, सांगली जिल्ह्यातील आंबा घाट आणि पुणे जिल्ह्यातील वरंधा घाट या ठिकाणी केलेल्या संशोधनामधून विंचवाच्या ‘कायरोमॅचिट्स’ या कुळातील दोन नव्या प्रजाती उजेडात आणल्या आहेत. त्यांना अनुक्रमे ‘कायरोमॅचिट्स पराक्रमी’ आणि ‘कायरोमॅचिट्स रामदासस्वामी’ अशी नावे देण्यात आल्याची माहिती या संस्थेतील संशोधक निखिल दांडेकर यांनी दिली.
खडकात राहणारे विंचू हे वृक्ष किंवा जमिनीवर राहणाऱ्या विंचवांपेक्षा कमी प्रमाणात स्थानबदल करीत असल्याने त्यांच्यात प्रदेशनिष्ठता मोठ्या प्रमाणात आढळते. याला ‘पॉइंट एंडेमिझम’ असे म्हणतात. एकाच स्थानाजवळील अधिवासाशी फार मोठा काळ संलग्न राहिल्यामुळे त्यांच्यात जनुकीय व शारीरिक बदलही झालेले आढळून येतात.
आंबा घाटातून संशोधित केलेल्या ‘पराक्रमी’ या प्रजाती नामाबद्दल अधिक सांगताना मुख्य संशोधक शौरी सुलाखे यांनी सांगितले, हे विंचू आम्ही सर्वप्रथम जिथे पाहिले ती जागा पावन खिंडीपासून अगदी जवळ आहे. पावन खिंडीचा गौरवशाली इतिहास मराठी माणसासाठी सदैव वंदनीय आहे. म्हणून तिथल्या पराक्रमाच्या आदराप्रीत्यर्थ आम्ही या विंचवाचे नाव ‘पराक्रमी’ असे ठेवले.वरंधा घाटालासुद्धा ऐतिहासिक महत्त्व आहे. घाटामध्ये ‘कावळ्या’ नावाचा किल्ला आहे. तसेच घाटाच्या पायथ्याला शिवथरघळ हे रामदासस्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेले ठिकाण आहे. म्हणून या स्थानावरून या प्रजातीला ‘रामदासस्वामी’ असे नाव दिले आहे.
संधीपाद जीवांची विविधता दुर्लक्षित
पक्षी, सस्तन प्राणी, सरीसृप या जीवांच्या तुलनेत संधीपाद जीवांची विविधता अजून दुर्लक्षित असून त्यावर मोठे संशोधन होणे आवश्यक असल्याचे, या मोहिमेचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संशोधक डॉ. देशभूषण बस्तावडे यांनी नमूद केले. अशा संशोधन मोहिमांमधून नवनवीन प्रजाती उजेडात आल्याने पश्चिम घाटाचे महत्त्व अधिकाधिक अधोरेखित होऊन त्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी हातभार लागणार असल्याचे सहसंशोधक गौरांग गोवंडे यांनी सांगितले. या संशोधन मोहिमेत सहसंशोधक निखिल दांडेकर यांच्या सोबतच मकरंद केतकर, सृष्टी भावे, चैतन्य रिसबूड व अक्षय मराठे यांचे सहकार्य लाभले.
माहिती दिल्याचा आनंद
‘पराक्रमी’ या प्रजातीबाबत सहसंशोधक डॉ. आनंद पाध्ये यांनी विशेष आठवण सांगितली. यानिमित्ताने या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय आणि अन्य जागतिक संशोधकांपर्यंत, विंचवांच्या संशोधनासोबतच या पराक्रमाचीही माहिती पोहोचल्याचा आनंद आहे, असे सहसंशोधक शुभंकर देशपांडे यांनी सांगितले.