कौंडण्यपूर विकासासाठी कॅनडा सरकारकडून ५०० कोटी, यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 06:59 PM2017-10-03T18:59:45+5:302017-10-03T19:00:14+5:30
अमरावती - विदर्भकन्या रुक्मिणीचे माहेर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकारकडून ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. पंढरपूर येथे झालेल्या विकास आराखडा परिषदेमध्ये कौंडण्यपूरची महती सांगताना यशोमती ठाकूर यांनी विकासाचा पाठपुरावा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निमंत्रणावरून कॅनेडाचे वाणिज्य दुतावासातील जॉर्डन ग्रीब्स व टारा शेऊरवॉटर पंढरपूर येथील विकास आराखडा परिषदेला उपस्थिती दर्शविली. यावेळी आमदार ठाकूर यांनी कौंडण्यपूरची महती विशद करताना श्रीक्षेत्र कौंडण्यपूर व पंढरपूरचे आध्यात्मिक व ऐतिहासिक महत्त्व पटवून दिले. त्यांचा या प्रयत्नाला कॅनडाच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार कौंडण्यपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकारकडून ५०० कोटी व पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी दोन हजार कोटी रुपये मिळणार आहेत.
या परिषदेला सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, आ. भरत भालके, आ. सुधाकर परिचारक, पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष अतुल राजे भोसले, पंढरपूरचे नगराध्यक्ष, अमरावती जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती जयंत देशमुख यांच्यासह वारकरी व हरिभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याने कौंडण्यपूरच्या विकासाला कॅनेडा सरकारकडून आर्थिक मदत मिळणार असल्याने या तीर्थक्षेत्राचा चेहरा-मोहरा पालटणार आहे.
कौंडण्यपूरचे महत्त्व ऐतिहासिक आहे. कॅनेडा शासनाच्या प्रतिनिधींना पंढरपुरातील परिषदेत ते महत्त्व पटवून दिले. यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही फोनवर सकारात्मक चर्चा झाली.
- यशोमती ठाकूर,
आमदार, तिवसा मतदारसंघ