शेतकरी संप आणि विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेला यश - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2017 10:03 PM2017-06-11T22:03:15+5:302017-06-11T22:03:15+5:30
संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यातील शेतक-यांनी पुकारलेला संप आणि काँग्रेससह विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेच्या दबावामुळे सरकार
ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 11 - संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यातील शेतक-यांनी पुकारलेला संप आणि काँग्रेससह विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेच्या दबावामुळे सरकार झुकले असून सरकारने तत्वतः सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची समाधानकारक अंमलबजावणी होईपर्यंत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आक्रमक राहणार आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटाचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
शेतक-यांचा ऐतिहासीक संप आणि विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून उभारलेल्या लढ्यापुढे झुकून सरकारला तत्वतः सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. सरकारने निर्णय घेतला असला तरी अद्याप त्या संबंधीचा शासन निर्णय काढलेला नाही. तसेच कर्जमाफीची तारीखही जाहीर केली नाही. सरकारने तात्काळ शासन निर्णय काढून कर्जमाफीचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा असे खा. चव्हाण म्हणाले. कर्जमाफीसाठी अनेक अटी व शर्ती घालून अनेक शेतक-यांना यातून वगळण्याची शक्यता आहे.या सरकारचा पुर्वानुभव चांगला नाही किंबहुना या सरकारला तत्चच नाहीत. त्यामुळे या निर्णयाची समाधानकारक अंमलबजावणी होत नाही आणि सरकट सर्व शेतक-यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष आक्रमकच राहणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.