सोळा वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश
By Admin | Published: November 9, 2016 05:00 AM2016-11-09T05:00:56+5:302016-11-09T05:00:56+5:30
चलनातून शंभर, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द कराव्यात, यासाठी अर्थक्रांती संस्था १६ वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत़ मोदी सरकारच्या या निर्णयाने पहिल्यांदाच यश आले आहे़
पुणे : चलनातून शंभर, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द कराव्यात, यासाठी अर्थक्रांती संस्था १६ वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत़ मोदी सरकारच्या या निर्णयाने पहिल्यांदाच यश आले आहे़ सरकारने आता सर्व कर रद्द करुन केवळ बँकिंग व्यवहारावर एकच कर ठेवण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलावे, अशी मागणी अर्थक्रांती या स्वयंसेवी संस्थेचे अनिल बोकिल यांनी केली आहे़
आजपर्यंत मागणीला कोणाकडूनही फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता़ कोणत्याही अर्थतज्ज्ञाने त्यावर अनुकूल अथवा प्रतिकुल असा प्रतिसाद दिला नव्हता, अशी खंत बोकिल यांनी व्यक्त केली. मात्र यानंतरच्या पोष्ट आॅपरेशनविषयी थोडी काळजी आहे़ या निर्णयाने राजकारण स्वच्छ होईल़ शेवटी हा निर्णय कोणा अर्थतज्ज्ञांनी नाही तर राजकीय नेतृत्वाने घेतला आहे़ या निर्णयाने काही काळ व्यवस्थेवर मोठा ताण येणार आहे़
पण, शरीर कॅन्सरने व्यापले असताना त्यावर शस्त्रक्रियाही अशीच मोठी करावी लागणार होती, असेही ते म्हणाले.
योगायोगाचा भाग असा की, गेल्या आठवड्यातच यासंबंधी आम्ही पंतप्रधानांना निवेदन दिले होते़ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना दोन वर्षांपूर्वी आमच्या या मागणीचे प्रेझेंटेशन केले होते़ त्यांनी मागणीला पाठिंबा दिला होता़
अर्थपूर्ण मासिकाचे सपांदक यमाजी मालकर यांनी सांगितले, की सरकारने हा धाडसी निर्णय घेतला आहे़ काळ्या पैशांचा राक्षस मारण्यासाठी या आॅपरेशनची गरज होती़ सरकारने ते अंशत: केले़ मात्र, आता अर्थक्रांतीच्या इतर चार मुद्द्यांचा विचार केला तरच सरकार पोस्टमार्टेम वाचवू शकेल़ भ्रष्टाचाराचे कुरण झालेली कर पद्धती रद्द करावी़ (प्रतिनिधी)