मूकनाट्यात एसएनडीटी विद्यापीठाचे यश
By admin | Published: February 27, 2017 01:28 AM2017-02-27T01:28:07+5:302017-02-27T01:28:07+5:30
चर्चगेट येथील एसएनडीटी महिला विद्यापाठाने मूकनाट्य स्पर्धेत यश मिळवले. विद्यापीठाने पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात चर्चगेट येथील एसएनडीटी महिला विद्यापाठाने मूकनाट्य स्पर्धेत यश मिळवले. विद्यापीठाने पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला, तर कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रीय महोत्सवात दुसरा क्रमांक मिळवला.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने ३२ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. महोत्सवात एसएनडीटी महिला विद्यापीठ संघातील ऋतुजा मारणे, अरुणा पवार, प्राची कोरपड, दीपाली बिर्जे, वर्षा डोईफोडे आणि माधवी भोसले यांनी दर्जेदार मुकाभिनय करून उपस्थितांची मने जिंकली. कृणाल पाटील आणि विनायक सैद यांनी या मूकनाट्याचे दिग्दर्शन केले होते़
कल्पना, सादरीकरणातील नावीन्यपूर्णता, मेकअप, संगीत आणि एकूण सादरीकरण या सर्व निवड निकषांवर एसएनडीटी संघाने छाप पाडली. पश्चिम विभागात एसएनडीटी संघाने अव्वल क्रमांक पटकावला होता, तर राष्ट्रीय स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
कोणत्याही संवादाशिवाय प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणे आणि त्यांना योग्य संदेश देणे हे जिकरीचे काम होते. स्पर्धेत १५ संघांमधून दुसरा क्रमांक मिळवल्याने मी समाधानी आहे. आगामी युवा महोत्सवात पुन्हा जोमाने तयारी करून, विजेतेपदाला गवसणी घालण्याचा विश्वास दिग्दर्शक कृणाल पाटीलने व्यक्त केला. (प्रतिनिधी)
मूकनाट्य स्पर्धेत विभागीय
स्पर्धेतून पहिली तीन मूकनाट्ये पात्र ठरली होती. अशा पाच झोनमधून प्रत्येकी तीन महाविद्यालये स्पर्धेत होती. तेथे विविध स्पर्धकांनी वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी केली होती. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत काही गुणांच्या फरकाने निकाल अपेक्षित होता.