राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात जलसंपदा विभागाला यश, कोल्हापूरकरांनी घेतला सुटकेचा निश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 04:04 PM2021-12-29T16:04:30+5:302021-12-29T16:46:52+5:30
Radhanagri Dam News: जलसंपदा विभागाला अथक प्रयत्न करून दुपारी सव्वा तीनच्या सुमारास राधानगरी धरणाचे दरवाजे बंद करण्यात यश आले, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.
कोल्हापूर - आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे तांत्रिक काम सुरु असताना अचानक अपघाताने सर्विस गेट ओपन झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत होता. दरम्यान, जलसंपदा विभागाला अथक प्रयत्न करून दुपारी सव्वा तीनच्या सुमारास धरणाचे दरवाजे बंद करण्यात यश आले, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.
आज सकाळी साडे नऊ च्या दरम्यान राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना अपघाताने सर्व्हिस गेट ओपन झाले होते. यामुळे नदीपात्राची पाणी पातळी वाढत होती. नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला होता. जलसंपदा विभागाच्या अथक परिश्रमानंतर राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आला आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
आज सकाळी राधानगरी धरणामधील सर्व्हिस गेटचं काम सुरू होतं. त्यावेळी एक दरवाजा खाली घेण्याचं काम सुरू असताना ही तांत्रिक समस्या निर्माण होऊन दरवाजा अडकला. त्यामुळे धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. विसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने नदीतील पाण्याची पातळी तीन ते चार फुटांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पंचगंगा नदीपात्राशेजारी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.