आईच्या संस्कारामुळे ५० वर्षांच्या सार्वजनिक जीवनात यशस्वी
By Admin | Published: April 24, 2017 03:13 AM2017-04-24T03:13:32+5:302017-04-24T03:13:32+5:30
बाळंतीण झाल्यानंतर चौथ्या दिवशीच शरद नावाच्या बाळाला सोबत घेऊन स्वातंत्र्य चळवळीच्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या
औरंगाबाद : बाळंतीण झाल्यानंतर चौथ्या दिवशीच शरद नावाच्या बाळाला सोबत घेऊन स्वातंत्र्य चळवळीच्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या ‘आई’ने बालपणी केलेल्या संस्कारामुळेच ५० वर्षांच्या सार्वजनिक, सांस्कृतिक जीवनात यशस्वी झालो, असे भावोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाला आणि नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार मराठी रंगभूमीवर लक्षणीय कार्य केल्याबद्दल डॉ. जब्बार पटेल यांना रविवारी मसापच्या नाट्यगृहात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी विचारमंचावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कौतिकराव ठाले पाटील, मधुकरअण्णा मुळे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, कवी ना. धों. महानोर, डॉ. मनोहर जाधव, डॉ. दिलीप घारे, किरण सगर आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी मराठी भाषा, रंगभूमीवर भाष्य केले. मराठी भाषा ही वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी आहे. मुंबईतील मराठी भाषेत सर्व देशातील भाषांचे मिश्रण पाहायला मिळते. तर पुणे, कोल्हापूर, सातारा, विदर्भ, मराठवाड्यातील मराठी भाषेचे विभागानुसार वेगळेपण आढळते. या सर्वांमध्ये मराठवाड्यातील संतांची भूमी वेगळीच आहे. या भूमीत पे्रमाचा ओलावा जाणवतो. याची प्रचीती अनेक वेळा आलेली आहे. यामुळे ‘मसाप’ने दिलेल्या पुरस्काराचे मोल असल्याचे पवार यांनी सांगितले. मी लिहिलेल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्यामुळे आणखी काही लिहावे असे वाटत आहे. परंतु सार्वजनिक जीवनातून वेळ मिळेल की नाही, हे सांगता येत नसल्याचे पवार म्हणाले.
....अन् मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबला
यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना गेवराईहून पैठणमार्गे औरंगाबादला येत होते. तेव्हा पैठणजवळ एका वृद्ध महिलेने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला हात केला. तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी गाडी थांबविण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. मात्र, त्या वृद्ध महिलेकडे चव्हाण गेले तेव्हा तिने त्यांच्या हातात एक चांदीचे नाणे टेकवले. कारण काय तर तू राज्यासाठी चांगले काम करतोस याचे बक्षीस म्हणून. असा प्रेमाने ओतप्रोत भरलेला मराठवाडा असल्याचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला. (प्रतिनिधी)