नेसरीकरांवर यशस्वी त्वचारोपण
By admin | Published: May 13, 2015 01:43 AM2015-05-13T01:43:50+5:302015-05-13T01:43:50+5:30
काळबादेवी येथील आगीत भाजून जखमी झालेल्या सुनील नेसरीकर यांच्यावर मंगळवारी ऐरोलीतील बर्न सेंटर रुग्णालयात यशस्वी त्वचारोपण
नवी मुंबई : काळबादेवी येथील आगीत भाजून जखमी झालेल्या सुनील नेसरीकर यांच्यावर मंगळवारी ऐरोलीतील बर्न सेंटर रुग्णालयात यशस्वी त्वचारोपण करण्यात आले. जळलेली त्वचा काढून तिथे दुसरी त्वचा बसवण्यासाठी सुमारे ६ तास लागले. तर सुधीर अमिन यांच्यावर मात्र अद्याप शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही.
सुनील नेसरीकर व सुधीर अमिन गंभीर जखमी झाले आहेत. नेसरीकर हे ५० टक्के तर अमिन हे ९० टक्के भाजले आहेत. दोघेही बर्न सेंटर रुग्णालयात उपचार घेत आहेत. मंगळवारी नेसरीकर यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. सुनील केशवानी यांनी सांगितले. त्यांच्या दोन्ही पायांवरील जळालेली त्वचा काढून दुसरी त्वचा बसवण्यात आली. याकरिता त्यांच्या शरीरावरील चांगल्या त्वचेचा तसेच रुग्णालयाच्या स्कीन बँकेतील काही त्वचेचा वापर करण्यात आल्याचेही डॉ. केशवानी यांनी सांगितले. पुढील पाच दिवस त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहेत. मात्र सुधीर अमिन यांच्या प्रकृतीत अद्याप आवश्यक ती सुधारणा झालेली नसून ते व्हेंटिलेटरवर आहेत. यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
नेसरीकरांवर रविवारी एक शस्त्रक्रिया झाली होती.
यानंतर त्यांची जळलेली त्वचेला संसर्ग होऊ नये, त्वचेला त्रास होऊ नये म्हणून त्वचारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्वचारोपणासाठी ८० टक्के त्वचा त्वचापेढीतून घेण्यात आली होती तर २० टक्के नेसरीकरांची त्वचा घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)