असाध्य आजारावर यशस्वी उपचार
By admin | Published: August 4, 2014 12:58 AM2014-08-04T00:58:08+5:302014-08-04T00:58:08+5:30
अॅडव्हान्स होमिओपॅथीमध्ये कुठल्याही असाध्य आजारावर यशस्वी उपचार शक्य झाले आहेत. परिणामी, रक्ताच्या कर्करोगापासून ते ट्यूमरचे गंभीर रुग्ण बरे होऊ लागले आहेत,
‘होमिओ क्रिटिकॉन’कार्यशाळा : होमिओपॅथी डॉक्टरांचा दावा
नागपूर : अॅडव्हान्स होमिओपॅथीमध्ये कुठल्याही असाध्य आजारावर यशस्वी उपचार शक्य झाले आहेत. परिणामी, रक्ताच्या कर्करोगापासून ते ट्यूमरचे गंभीर रुग्ण बरे होऊ लागले आहेत, असा दावा होमिओपॅथिक असोसिएशन आॅफ प्रिडिक्टिव्ह फिजिशियनचे डॉ. रवी वैरागडे व डॉ. किशोर नरड यांनी संयुक्तरीत्या केले. यावेळी त्यांनी संबंधित रुग्ण आणि त्यांचे केसपेपर प्रेझेंटेशनसुद्धा सादर केले.
गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बॅक सभागृहात रविवारी ‘होमिओ क्रिटिकॉन-२०१४’ या एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी यशस्वी उपचाराची तपशिलवार माहिती देऊन मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन प्रसिद्ध होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. भाऊसाहेब झिटे, डॉ. कासीम चिमठानवाला, डॉ. विलास डांगरे यांच्या उपस्थितीत झाले. मंचावर डॉ. गोापल बेले, डॉ. वैरागडे, डॉ. नरड, डॉ. मनीष पाटील, डॉ. संजय राऊत, डॉ. रवींद्र पारेख व डॉ. सुनील पारसे उपस्थित होते.
डॉ. चिमठानवाला म्हणाले, प्रत्येक होमिओपॅथी डॉक्टरांनी या पॅथीला धर्म म्हणून पाळावा. असे झाल्यास होमिओपॅथी खूप समोर जाईल. डॉ. झिटे म्हणाले, ‘होमिओ क्रिटिकॉन’ कार्यशाळेच्या माध्यमातून डॉक्टरांमध्ये आत्मविश्वास वाढविण्याच्या अभियानाला सुरुवात झाली आहे. हे अभियान असेच सुरू रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. डांगरे म्हणाले, होमिओपॅथीला चांगले दिवस आले आहेत. यामुळे या पॅथीच्या डॉक्टरांनी यात नवनवीन संशोधन व अभ्यास करून त्याची माहिती इतरांना देणे गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)
अॅडव्हॉन्स होमिओपॅथी स्टेम सेल्ससारखीच
डॉ. वैरागडे म्हणाले, अनेक व्याधी ज्या आधुनिक वैद्यकशास्त्राला आव्हानात्मक वाटतात त्या व्याधीवर अॅडव्हान्स होमिओपॅथीमुळे ६० ते ८० टक्के यश मिळाले आहे. यात वंशपरंपरागत आजारही बरे झाले आहेत. एवढेच नव्हे तर या संपूर्ण केसेसचे ‘डॉक्युमेंटेशन’सुद्धा उपलब्ध आहे. सध्या उपचार पद्धतीला जेनेटिक बेस्ड बनवून सायंटिफिक उपचार करण्यात येत आहे. हा उपचार केवळ आजारच दूर करीत नाही तर मुळासकट नष्ट करतो. डॉ. नरड म्हणाले, ८० वर्षांचा एक रुग्ण रक्ताच्या कर्करोगापासून बरा झाला. एका बालकाला बे्रन ट्यूमर होता. तीन वर्षांपूर्वी त्याच्यावर तीनदा शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनीही आशा सोडली होती. पण अशा स्थितीत त्याच्यावर होमिओपॅथी उपचार करण्यात आले. आता तो बालक सामान्य जीवन जगत आहे. त्यामुळे आता कॅन्सर, ट्यूमर, रक्तदाब असो वा इतर कोणताही आजार त्यावर आता अॅडव्हान्स होमिओपॅथीने उपचार करणे शक्य झाले आहे. कार्यशाळेत देशभरातील ६५० डॉक्टर सहभागी झाले होते.
एनआयएचआरसी नागपुरात व्हावे
महाराष्ट्रात सर्वात जास्त होमिओपॅथीचे कॉलेजेस आहेत. डॉक्टरांची संख्याही इतर राज्याच्या तुलनेत मोठी आहे. यामुळे राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे नागपुरात ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ होमिओपॅथी रिसर्च सेंटर’ (एनआयएचआरसी) होणे आवश्यक आहे. असे झाल्यास संशोधनाला प्रोत्साहन व बळकटी मिळेल. यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ. मनीष पाटील यांनी केले.