अकोल्यातील पातूरमध्ये केशर लागवडीचा प्रयोग यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 09:09 AM2017-07-19T09:09:56+5:302017-07-19T09:11:57+5:30
डॉ. दिगंबर रमेश क्षीरसागर यांनी विदर्भात केशराची शेती फुलवली आहे. यातून त्यांनी अवघ्या साडेपाच महिन्यात १० लाख ८० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवलाय.
संतोष गवई/ऑनलाइन लोकमत
शिर्ला ( अकोला ), दि. 19 - अमेरिकेतील विषुववृत्तीय प्रदेश आणि काश्मीर खोऱ्यात प्रामुख्याने घेतल्या जाणाऱ्या अमेरिकन केशर पिकांच्या लागवडीचा प्रयोग पातूर परिसरातील कांद्यांच्या पट्ट्यात यशस्वी झाला आहे. पातूर तालुक्यातील विवरा येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. दिगंबर रमेश क्षीरसागर यांनी जिद्दीच्या बळावर काश्मिरात नव्हे, विदर्भात केशराची शेती फुलवली आहे. या शेतीतून त्यांनी अवघ्या साडेपाच महिन्यात १० लाख ८० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.
डॉ.दिगंबर क्षीरसागर यांच्याजवळ एकूण तीन एकर 20 गुंठे जमीन आहे . या जमिनीवर इतर शेतकऱ्यांप्रमाणे ते सोयाबीन आणि कपाशीची नफ्याबाबत भरवसा नसणारी पिके घेत होते; मात्र त्यांना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील संदेश पाटील यांनी केशर शेती यशस्वी केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी चार मित्रांना सोबत घेऊन मोरगाव खुर्द येथील संदेश पाटील यांच्या केशर शेतीची पाहणी केली.
त्यांनी संदेश पाटील यांच्याशी चर्चा करून केशर शेतीसाठी लागणारे केशरबीज कुठे मिळते, त्यासाठी खते कोणती, त्या पिकावर येणारे रोग व त्याच्या संरक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर राजस्थानातून शिखर व काश्मिरातील पामपूर येये जाऊन ९० हजार रुपयांचे केशर बीज घेतले. त्याची पेरणी विवरा येथील एक एकर शेतात केली. त्या पिकाची योग्य प्रकार काळजी घेऊन वाढविले. त्यानंतर अवघ्या साडेपाच महिन्यात २७ किलो केशराचे भरघोस उत्पादन घेतले. सध्या केशराची किमत बाजारपेठेत १0 लाख ८0 हजार रुपये आहे.
जिद्दीपोटी केशर शेतीकडे वळलो!
सोयाबीन व कापसाची पारंपरिक पिके घेऊन समाधानकारक उत्पन्न आणि भाव मिळत नाही, हे समजल्याने पीक पद्धतीत प्रयोग करण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. पहिल्याच प्रयोगात अमेरिकेत व काश्मीरसारख्या प्रदेशात येणाऱ्या केशर पिकाच्या लागवडीचा प्रयोग विदर्भात यशस्वी केला, अशी प्रतिक्रिया प्रयोगशील शेतकरी डॉ. डिगांबर क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
राजस्थान व काश्मिरातून आणले केशरबीज
डॉ. क्षीरसागर यांनी विवराच्या स्वत:च्या मालकीच्या एक एकर क्षेत्रावर अमेरिकन केशराची लागवड करण्याकरिता बियाणे खरेदीसाठी काश्मीरचे पामपूर तर राजस्थानचे शिखर गाठले. तेथून ९० हजार रुपयांचे केशर बीज खरेदी करून त्याची शेतात लागवड केली.