विमान तिकिटांची अशीही फसवाफसवी

By admin | Published: April 26, 2017 02:30 AM2017-04-26T02:30:55+5:302017-04-26T02:30:55+5:30

अवघ्या तीन ते चार हजारांत मिळणारे विमान तिकीट १० ते २७ हजार रुपयांत विकून प्रवाशांची फसवणूक करणारे रॅकेट एजंट आणि विमान

Such cheat of air tickets | विमान तिकिटांची अशीही फसवाफसवी

विमान तिकिटांची अशीही फसवाफसवी

Next

मनीषा म्हात्रे / मुंबई
अवघ्या तीन ते चार हजारांत मिळणारे विमान तिकीट १० ते २७ हजार रुपयांत विकून प्रवाशांची फसवणूक करणारे रॅकेट एजंट आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू आहे. मुंबईच्या एका कुटुंबातील ३२ प्रवाशांचे बुकिंग असतानाही ऐनवेळी बोर्डिंगची वेळ चुकल्याचे कारण सांगून एका विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवासास मज्जाव केला. तसेच जास्तीचे पैसे मागत नवीन तिकिटे काढण्यास सांगितले. या प्रकरणी एजंट सचिन वर्मा व विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात ताडदेव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताडदेवमध्ये राहणारे व्यावसायिक जयंती वीरजी राठोड (४५) यांनी नोव्हेंबर २०१६मध्ये दिवाळीच्या सुटीत कुटुंबीय आणि मित्र मंडळी अशा ३२ जणांनी हरिद्वार, मथुरा आणि आग्रा या ठिकाणी फिरायला जायचे ठरवले. त्यानुसार ४ ते १३ नोव्हेंबर दरम्यान मुंबई ते दिल्ली टे्रनने, त्यानंतर १३ नोव्हेंबरला दिल्ली ते मुंबई हा प्रवास विमानाने करण्याचे ठरले. विमानाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी त्यांना २ आॅगस्ट रोजी जस्ट डायलवरून काही एजंटची नावे मिळाली. त्यानुसार त्यांनी सचिन वर्माकडून प्रत्येकी ४ हजार ८०० रुपये प्रमाणे ३२ तिकिटे बुक केली. त्यानंतर आणखी ५३०० दराने तीन तिकिटे बुक केली. १९ आॅक्टोबरला त्यांना ३५ तिकिटे आरक्षित झाल्याचे समजले. १३ नोव्हेंबरला परतीच्या प्रवासासाठी दिल्लीचे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट गाठले.
राठोड यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, १०.४५ची फ्लाईट असल्याने त्यांनी सर्वांचे तिकीट घेऊन तेथे बोर्डिंग पास मागितला. त्यांना तेथील सुपरवायझर गौरी यांच्याकडे जाण्यास सांगण्यात आले. तर गौरी यांनी एजंटशी संपर्क साधण्यास सांगितले. त्याचा मोबाइल बंद होता. तोपर्यंत बोर्डिंगची वेळ निघून गेल्याने पास देता येणार नसल्याचे सांगितले. प्रत्येकी २७ हजार ३०० रुपयांचे नवीन तिकीट बुक करावे लागेल, असेही सांगण्यात आले. प्रवाशांनी गोंधळ घातल्यावर १०च्या सुमारास ७ पैकी तिघांना बोर्डिंग पास मिळाला. अखेर राठोड यांनी अन्य एजंटकडून प्रत्येकी १० हजार रुपये देऊन तिकीट बूक केले.
या दहा हजारांपैकी विमान कंपनीच्या खात्यात अवघे ३ हजार१५३ रुपये जमा झाल्याची माहिती राठोड यांना नंतर मिळाली. वरिष्ठांच्या दबावापोटी पोलीस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा राठोड यांचा आरोप आहे. तर ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे म्हणाले, सचिन वर्मा याला लवकरच अटक करण्यात येईल. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर इतरांवर कारवाई होईल.

Web Title: Such cheat of air tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.