असे छंद: अमूर्तांना मूर्त रूप देणारी ऋतिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 11:43 AM2023-11-26T11:43:48+5:302023-11-26T11:44:39+5:30
Ritika Palkar: कुठल्याही हत्याराशिवाय फक्त दगडाचा वापर करून कोणतीही कलाकृती निर्माण करता येईल का? अर्थातच होय, हे दगड जर ऋतिका पालकर हिच्या हातात पडले तर.
- अभय फाटक
खाद्या दगडातून मूर्ती घडवायला मूर्तिकाराला अनेक छिन्नी हतोड्यांचे घाव घालायला लागतात. पण कुठल्याही हत्याराशिवाय फक्त दगडाचा वापर करून कोणतीही कलाकृती निर्माण करता येईल का? अर्थातच होय, हे दगड जर ऋतिका पालकर हिच्या हातात पडले तर. नुसत्या दगडाच्या आकृतिबंधातून ऋतिका हिने साकारल्या आहेत अनेक कलाकृती. निर्जीव दगडाला बोलत करण्याची कला ऋतिकाने आत्मसात केली आहे.
ऋतिकाने आपल्या कलाकृतींचं माध्यम म्हणून नदीपात्रातील, समुद्रकिनाऱ्यावरील दगडांना निवडलं. लहान-मोठ्या, वेगवेगळ्या रंगांच्या दगडांमध्ये तिला अनेक आकृतिबंध दिसू लागले. लहानपणापासूनच ऋतिका कलोपासक. त्यात तिचे वडील अनुभवी काष्टशिल्पकार. त्यांची कला बघून ऋतिकाला प्रेरणा मिळाली. त्यांच्या बरोबर नदी, समुद्रकिनारी फेरफटका मारताना, जंगलात फिरताना निसर्गाची अनेक रूप पाहून शोधक नजर तयार झाली.
निसर्गाबद्दल आदर आणि आकर्षण असल्यामुळे नैसर्गिक वस्तू वापरून कलाकृती करताना आनंद मिळत होता. खरी तिला आवड व्हिडीओ/फोटो एडिटिंगची. वडिलांच्या न्यूज एडिटिंग क्षेत्रात मदत करताना तिला स्टोन आर्टचा छंद लागला. निसर्गाकडून प्रेरणा घेऊन ऋतिकाने दगडातून ग्रामीण जीवनातील व्यक्तिरेखा साकारल्या. त्याचप्रमाणे विठ्ठल, कृष्ण आणि बुद्धीची देवता गणपती यांचे आकृतिबंध साकारले.
ऋतिका हे सर्व करताना दगडांचे नैसर्गिक आकार आणि रंग तसेच ठेवते. त्याला मानवनिर्मित रंगात रंगवत नाही. दगडांचे नैसर्गिक रंग रूप कायम राहील याची काळजी घेते. दगडांचे आकार निरखून पहिल्यानंतर तिला वेगवेगळ्या कल्पना सुचतात आणि एक नवीन कलाकृती जन्माला येते, असा आपला अनुभव असल्याचं ऋतिका सांगते. प्रदर्शनातून भाग घेऊन ऋतिकाने आपली कला लोकांच्या समोर आणली आहे. २०१९ मध्ये ऋतिकाला या कलेसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.