‘अशी’ भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 01:24 AM2018-04-08T01:24:07+5:302018-04-08T01:24:07+5:30
‘ते’ सध्या ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत, ‘ती’ मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली.
औरंगाबाद : ‘ते’ सध्या ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत, ‘ती’ मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली.
येथील एका उर्दू दैनिकाच्या ५० व्या वर्धापन दिन सोहळ्याला ते आले होते. आम्हीही सत्तेत होतो; मात्र अशी खालच्या पातळीवरची भाषा कधी वापरली नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.
काल मुंबईत भाजपाचा महामेळावा झाला. त्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांचा समाचार घेताना त्यांना प्राण्यांची विशेषणे लावली होती. त्यावर चव्हाण यांनी नापसंती दर्शविली. महिनाभरात आघाडीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी होऊ शकेल, अशी शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली.
देशभरात सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी राहुल गांधी ९ एप्रिलला उपोषण करणार आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे पाठिंबा म्हणून लाक्षणिक उपोषण व त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात सभाही होतील. मुंबईत अलीकडेच तीन दिवसीय आढावा बैठक झाली. त्यामध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला. राजकीय परिस्थिती रोज बदलत आहे. राहुल गांधी यांच्याकडे आम्ही आमचा अहवाल देऊ. आघाडीबद्दल राहुल गांधी व शरद पवार यांच्यात चर्चा होऊन निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.
भाजपा हा भांडवलदारांचा पक्ष
चिखली (बुलडाणा) : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात आणि राज्यात सत्ता हस्तगत केलेला भाजपा हा केवळ सत्तेसाठी हपापलेला पक्ष आहे. तो केवळ भांडवलदारांसाठी काम करतो, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
खा. चव्हाण म्हणाले, काँग्रेस हा सत्यासाठी लढा देणारा पक्ष आहे. काँग्रेसचा विचार मजबूत होता, म्हणून देश उभा राहिला. जनतेनेही ६० वर्षे सत्तेची संधी पक्षाला दिली, परंतु गेल्या चार वर्षांत भाजपा सरकारने एकही नवी योजना राबविली नाही, उलट अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. आता समाजातील एकही घटक या सरकारवर खूश नाही. मुख्यमंत्री आपल्या पदाला न शोभणारे वक्तव्य करून, जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतात. सत्तेची धुंदी चढल्याने त्यांनी पातळी सोडली आहे. त्यांचा मस्तवालपणा वाढला आहे. त्यांना लोकशाहीचादेखील विसर पडला असून, ऊठसूट धमकावण्याची भाषा वापरली जात आहे. विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांनादेखील धमकावले जाते़