क्रिकेटमध्ये अशा चुका होत असतात
By admin | Published: July 13, 2017 02:11 AM2017-07-13T02:11:21+5:302017-07-13T02:11:21+5:30
‘चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यानंतर माझ्याविषयी कोण काय बोलतं यावर मी विचार करत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यानंतर माझ्याविषयी कोण काय बोलतं यावर मी विचार करत नाही. क्रिकेटमध्ये अशा चुका होत असतात. अशा चुका मुद्दामहून होत नाही,’ अशा शब्दांत भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा याने भारत - पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्याविषयी आपली प्रतिक्रीया दिली.
इंग्लंडमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात जडेजा व हार्दिक पांड्या यांच्यात झालेल्या गोंधळामुळे पांड्या धावबाद झाला होता. यानंतर क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियाद्वारे जडेजावर टीका केली होती. याविषयी विचारले असता
जडेजा म्हणाला की, ‘जे कट्टर क्रिकेटप्रेमी आहेत, त्यांना माहित
आहे की क्रिकेटमध्ये अशा चुका
होत असतात. असे धावबाद कोणताही खेळाडू मुद्दामहून करत नाही. ती एक नकळतपणे झालेली चुक होती आणि खेळामध्ये असे होत असते.’
वेस्ट इंडिज दौऱ्याहून जडेजा थेट मुंबईत बुधवारी एका कार्यक्रमासाठी उपस्थित झाला होता. यावेळी त्याने म्हटले की, ‘आयपीएल युवा खेळाडूंसाठी खूप चांगली संधी असते. मी आयपीएलद्वारेच राजस्थान रॉयल्स संघातून स्वत:ला सिध्द केले. माझ्यासाठी ती मोठी संधी होती. निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न होता. प्रत्येक युवा खेळाडूने आयपीएलद्वारे मिळालेली संधी साधली, तर तो उच्च क्रिकेट खेळू शकतो.’
विदेशामध्ये आश्विन - जडेजा अपयशी ठरतात अशी नेहमी टीका होते, याबाबत विचारले असता जडेजा म्हणाला, ‘टिकाकारांचे काम असते टीका करणे. मी त्यांच्यासाठी नाही, तर माझ्यासाठी खेळतो. मी प्रत्येक परिस्थितीमध्ये माझा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतो.’ तसेच, ‘मी माझ्या खेळामध्ये काही खास बदल केले नव्हते. माझे सर्व लक्ष खेळावर केंद्रीत होते. महत्त्वाचे म्हणजे मी अधिक मेहनत घेण्यावर भर दिला आणि त्याचा मोठा फायदा झाला,’ असेही जडेजाने म्हटले.
>आज लोकांकडे वेळेची कमतरता आहे. टी२० सामना साडेतीन तासांत संंपतो. एकेरी दुहेरीपेक्षा क्रिकेटप्रेमींना चौकार षटकार आवडतात. त्यामुळे टी२० लोकप्रिय आहे. पण यामुळे कसोटी क्रिकेट अजिबात संपणार नाही. जागतिक स्तरावर कसोटी क्रिकेटला मोठा मान आहे. इंग्लंडसारख्या देशात आजही मोठ्या संख्येने कसोटी क्रिकेट बघायला क्रिकेटप्रेमी येतात. टी२० आणि कसोटी क्रिकेट पूर्णपणे वेगळे असून, ते आपआपल्या जागी आहेत. - रवींद्र जडेजा