हातरूणच्या डोंगरेंची अशीही भीमनिष्ठा
By Admin | Published: April 14, 2015 01:14 AM2015-04-14T01:14:39+5:302015-04-14T01:14:39+5:30
तुकाराम डोंगरे यांनी १९६४मध्ये बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हातरूणसारख्या छोट्याशा गावातून ९ रुपयांची मनिआॅर्डर पाठवली होती.
बाबासाहेबांच्या स्मारकासाठी केली होती ९ रुपयांची मनिआॅर्डर
अकोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत योगदान देणाऱ्या भीमसैनिकांची मोठी संख्या जिल्ह्यात आहे. त्यापैकीच एक असलेल्या तुकाराम डोंगरे यांनी १९६४मध्ये बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हातरूणसारख्या छोट्याशा गावातून
९ रुपयांची मनिआॅर्डर पाठवली होती.
बाळापूर तालुक्यात असलेल्या हातरूण येथील तुकाराम गोंदाजी डोंगरे यांनी मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा प्रत्यक्ष बघितली होती. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या काळापासून ते आंबेडकरी चळवळीत एकनिष्ठेने कार्यरत आहेत. १९६४मध्ये चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देशभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला होता. त्या वेळी हातरूण येथून डोंगरे यांनी
९ रुपयांची मनिआॅर्डर पाठविली होती. ही मनिआॅर्डर ७ मे १९६४ रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भैयासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांनी स्वीकारली होती. त्यांच्या स्वाक्षरीची पोचपावती आणि मनिआॅर्डरची प्रत आजही डोंगरे यांनी जपून ठेवली आहे. कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानादेखील बाबासाहेबांच्या स्मारकासाठी त्या काळी स्वकमाईतून
९ रुपये देण्याचे औदार्य डोंगरे यांनी दाखविले होते. केवळ बाबासाहेबांवरील निष्ठेमुळेच त्यांनी पोटाला चिमटा घेऊन बाबासाहेबांचे स्मारक उभे राहावे म्हणून खारीचा वाटा उचलला होता. (प्रतिनिधी)
बाबासाहेबांनी दिली होती ‘प्रबुद्ध भारत’ची पावती!
बाबासाहेबांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या काळापासून आंबेडकरी चळवळीत एकनिष्ठेने कार्यरत तुकाराम डोंगरे हे ‘प्रबुद्ध भारत’चे वार्षिक वर्गणीदार होते. त्यांना बाबासाहेबांनीच प्रत्यक्ष प्रबुद्ध भारत सभासद वर्गणीची पोच दिली होती. डोंगरे यांनी हा अनमोल ठेवा आजही जपून ठेवला आहे.