मुख्यमंत्र्यांची अशीही टोलेबाजी
By admin | Published: July 21, 2016 04:39 AM2016-07-21T04:39:08+5:302016-07-21T04:39:08+5:30
कोपर्डी प्रकरणावरून विधान परिषदेत उपस्थित झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर फटकेबाजी करत विरोधकांना नामोहरण केले.
मुंबई: कोपर्डी प्रकरणावरून विधान परिषदेत उपस्थित झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर फटकेबाजी करत विरोधकांना नामोहरण केले. काँग्रेसचे नेते नारायण राणे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांचा त्यांनी समाचार घेतला.
परदेशी कशाला
देशीच काफी!
मुख्यमंत्री कार्यालयातील
सचिव प्रवीण परदेशी हे आपल्याविरोधात बातम्या पेरत असल्याचा आरोप राणे यांनी केला होता. त्याचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, तुमच्या विरोधात बातम्या द्यायला परदेशी कशाला, देशीच काफी आहेत. तुमच्या पक्षातील कोणाबद्दल तुम्ही चांगलं बोलता का? तुमच्याच पक्षातील लोक तुमच्या विरोधात बातम्या पेरत असतात, असा थेट हल्ला मुख्यमंत्र्यांनी केला.
म्हणून पिडीत कुटुंबाची भेट घेतली नाही
पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्ह्याचा तपास चालू आहे. त्यामुळे
पीडित व्यक्तीच्या घरी जाता
येत नाही. भेट दिल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबियांची अन्यत्र भेट घ्या किंवा आरोपपत्र निश्चित झाल्यानंतर भेटा, असा सल्ला पोलिसांनी दिला. त्यामुळे मी अजून कोपर्डीला गेलेलो नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला.
तर मंत्री पदावर
राहणार नाही
राज्य सरकारमधील एखादा मंत्री गुन्हेगार सापडला तर एक मिनिटही तो पदावर राहणार नाही. मात्र साप म्हणून भुई थोपटत असाल, तर एकही मंत्री राजीनामा देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी निक्षून सांगितले. महिला अधिका-याचा विनयभंग करणा-या मंत्र्यांबाबत राणे यांनी आरोप करण्यापेक्षा त्याबाबतची माहिती दिली पाहिजे. असे मुद्दे विधान परिषदेत राजकारण करण्यासाठी वापरायचे नसतात, असाही टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला.
विरोधी पक्षाची अवस्था बोफोर्स तोफांसारखी
राज्य सरकारवर बेछूट आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाची अवस्था बोफोर्सच्या तोफांसारखी झाली आहे, अशी उपमा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. या तोफांमध्ये ‘शूट अॅड स्कूट’ हे तंत्रज्ञान वापरले आहे. त्यात गोळा आपल्या अंगावर येऊ नये म्हणून मारा करायचा आणि जागा बदलायची अशी रचना असते. विरोधी पक्षातल्या नेत्यांनी हीच पद्धत सुरू केली असल्याचा टोला त्यांनी यावेळी हाणला.