साकव पूल गेला वाहून
By admin | Published: August 6, 2016 01:09 AM2016-08-06T01:09:33+5:302016-08-06T01:09:33+5:30
आपटी गावाला जोडणारा धामणदरा येथील जिल्हा परिषद रस्त्यावरील साकव पूल पाण्याच्या प्रवाहाने शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वाहून गेला.
लोणावळा : लोणावळा व पवनानगर दरम्यानच्या आपटी गावाला जोडणारा धामणदरा येथील जिल्हा परिषद रस्त्यावरील साकव पूल पाण्याच्या प्रवाहाने शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वाहून गेला. सुदैवाने रस्त्यावर जास्त वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, पूल वाहून गेल्याने आपटी ग्रामस्थांचा लोणावळ्याशी संपर्क तुटला आहे.
लोणावळा शहर व मावळ परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पवनानगर परिसरात पावसाचा जोर लोणावळ्यापेक्षा जास्त असल्याने ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. आपटी गावाला जोडणारा जिल्हा परिषदेच्या रोडवरील पूल हा डोंगरभागातून वाहणाऱ्या जोरदार पावसाने वाहून गेला. सोबत रस्त्याचा काही भागही वाहून गेल्याने आपटी ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. घटनेची माहिती मिळताच मावळ तालुक्याचे तहसीलदार शरद पाटील व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.(वार्ताहर)