संभाजीराजे छत्रपती आणि शिवेंद्रराजेंची अचानक भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 08:28 PM2022-05-29T20:28:44+5:302022-05-29T20:30:56+5:30
SambhajiRaje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती आणि सातारा घराण्यातील त्यांचे बंधू आणि भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आज अचानक भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात बरेच नाट्य रंगले होते. दरम्यान, अपक्ष उमेदवारीसाठी पुरेसे समर्थन न मिळाल्याने अखेर संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यातच संभाजी राजेंच्या वडिलांनी केलेल्या दाव्यामुळे या सर्व राजकीय नाट्याला वेगळेच वळण मिळाले आहे. या सर्व घडामोडींदरम्यान, संभाजीराजे छत्रपती आणि सातारा घराण्यातील त्यांचे बंधू आणि भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आज अचानक भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या भेटीची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. या संदर्भात फेसबूकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, आज प्रवासादरम्यान आमचे बंधू छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अचानक भेट झाली. महामार्गावर असून सुध्दा गाडी ओव्हरटेक करून त्यांनी भेट घेतली व आपुलकीने चौकशी केली. आनंद वाटला. कोल्हापूर व सातारा छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध असेच वृद्धींगत राहोत, हीच आई भवानी चरणी प्रार्थना!
दरम्यान, जून महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. संभाजीराजेंनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणाही केली होती. मात्र महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या संभाजीराजेंना शिवसेनेने जोरदार धक्का दिला होता. शिवसेनेत प्रवेश करून हाती शिवबंधन बांधल्यासच आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका शिवसेनेने घेतली. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींना धक्का बसला. अखेर त्यांनी निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले.