अवकाळी पावसाचा इशारा
By admin | Published: March 8, 2016 02:52 AM2016-03-08T02:52:28+5:302016-03-08T02:52:28+5:30
वातावरणात होत असलेल्या बदलामुळे हवामान खात्याने राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. ८ ते ११ मार्चदरम्यान विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल
मुंबई : वातावरणात होत असलेल्या बदलामुळे हवामान खात्याने राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. ८ ते ११ मार्चदरम्यान विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील आठवड्यात विदर्भापासून आसामपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ठिकठिकाणी पावसासह गारपिटीचा मारा झाला होता; शिवाय तापमानातील चढ-उतारानंतर मुंबईतही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.
भारतीय हवामान शास्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. कोकण-गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र
आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे. शहराचे कमाल तापमान ३३ तर किमान तापमान २२ अंशावर पोहोचले आहे. (प्रतिनिधी)