पुण्यात कारनं अचानक घेतला पेट, बाहेर पडण्यास वेळ न मिळाल्यानं तीन तरुणांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 09:01 AM2017-08-23T09:01:37+5:302017-08-23T12:51:21+5:30
पुणे, दि. 23 - पुण्यातील वडगाव आनंदमध्ये एका कारने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील तीन तरुणांचा होरपळून ...
पुणे, दि. 23 - पुण्यातील वडगाव आनंदमध्ये एका कारने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील तीन तरुणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. नगर-कल्याण महामार्गावरील आळेफाटाजवळ मंगळवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. गाडीतून प्रवास करणारे तिन्ही तरुण पुण्यावरुन घरी परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. गाडीनं पेट घेतल्यानंतर बाहेर येण्यास वेळ न मिळाल्यामुळे तिघांचाही होरपळून मृत्यू झाला आहे. बंटी चासकर, नरेश वाघ, दिलीप नवले अशी मृतांची नावे आहेत.
कसा झाला अपघात ?
आळेफाटाहून वडगाव आनंद येथे जात असताना बंटी चासकर, नरेश वाघ, दिलीप नवले यांच्या कारची पुलाला धडक बसली व यानंतर कारने पेट घेतला. हे तिघंही ओतूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. नरेश वाघ आणि दिलीप नवले हे औषध विक्रेते तर बंटी चासकर हे हॉटेल व्यावसायिक होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिघंही जण त्यांच्या मित्राला सोडण्यासाठी वडगाव आनंद येथे जात होते. गाडी भरधाव वेगात होती. प्रवासादरम्यान वाटेत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाला जाऊन धडकली. ही धडक एवढी भीषण होती की गाडीने पेट घेतला आणि या अग्नितांडवात तिघांचाही होरपळून जागीच मृत्यू झाला.
यावेळी काही नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्नही केला, मात्र यात त्यांना यश आले नाही. पोलीसही घटनास्थळी दाखल होईपर्यंत संपूर्ण गाडीचा जळून कोळसा झाला होता. दरम्यान, गाडीला धडक बसल्यानंतर शॉर्टशर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.