मुंबईबाबत थोडं जपूनच - उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
By admin | Published: December 9, 2014 01:22 PM2014-12-09T13:22:48+5:302014-12-09T13:29:32+5:30
मंगलकार्य करण्यास जावे व अचानक श्राद्ध घडावे हा धोका वाटत असल्याने मुंबईबाबत ताकही फुंकून प्यावे असे वाटते, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - मंगलकार्य करावयास जावे व अचानक श्राद्ध घडावे हा धोका वाटत असल्यानेच मुंबईच्या बाबतीत ताकही फुंकून प्यावे असे वाटते, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांना सल्लावजा इशारा देण्यात आला आहे. ‘मुंबई’च्या विकासाची सूत्रे थेट दिल्लीच्या हाती ठेवणे हे महाराष्ट्राला किती रुचेल व त्याचे राजकीय परिणाम काय होतील, याचा साधकबाधक विचार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाच असेल, असे लेखात म्हटले आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही व मुंबईवर फक्त महाराष्ट्र राज्याचेच नियंत्रण राहील हे शिवसेनेचे मत असल्याचे सांगत मुंबईवर जो पंतप्रधानांचा अंकुश येऊ पाहात आहे यावर शिवसेनेची भूमिका सरकार पक्ष म्हणून महत्त्वाची ठरणार असल्याचा इशारा अग्रलेखातून देण्यात आला आहे. मुंबईचा विकास व्हावा हे तर खरेच, पण रोगापेक्षा औषध भयंकर ठरेल असे काही घडू नये, असेही लेखात म्हटले आहे. मुंबई प्रमाणेच राज्यातील अन्य शहरांनाही जागतिक दर्जाचे केल्यास बरे होईल असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.