“युती तुटायला उद्धव ठाकरेच जबाबदार, त्यांच्या डोक्यात केवळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची होती”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 04:44 PM2023-08-09T16:44:33+5:302023-08-09T16:45:22+5:30
Sudhir Mungantiwar: बाळासाहेबांनी हेच शिकवले होते का तुम्हाला, असा सवाल करत सुधीर मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
Sudhir Mungantiwar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेतली. यावेळी शिवसेनेने युती तोडली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. भाजपने युती तोडली, मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केला होता, असा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला. यातच भाजप नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी युती तुटण्यासाठी उद्धव ठाकरेंच जबाबदार असल्याची टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाबाबत सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला. मीडियाशी बोलताना ते म्हणाले की, काय चूक आहे. युती आम्ही कधीच तोडली नाही. जेव्हा आमच्यासमोर आमचा मित्र अहंकार व्याप्त होतो, कपोलकल्पित कथा करून खुर्चीचा मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न करतो, हृदयात सत्तांध भाव, डोक्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, यातून राजकीय विश्वासघाताला जन्म दिला जातो. विश्वगौरव, देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत, महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच करतील, असे अनेकदा सांगितले गेले. तेव्हा जगातील सर्व फेव्हिकॉल ओठाला लावून शांत बसायचे आणि २०१९ मध्ये निवडणुकांचे निकाल यायला सुरुवात झाल्यावर हे निकाल विश्वासघातासाठी पोषक आहेत, हे लक्षात आल्यावर काही कथा करायच्या, अशी टीका करताना हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी हेच शिकवले होते का तुम्हाला, असा थेट सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
तुम्हाला आमच्यासोबत यायचे नव्हते, तर येऊ नका
तुम्हाला आमच्यासोबत यायचे नव्हते, तर येऊ नका. मात्र, खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तुम्ही का गेलात आणि आता अजित पवार आम्हाला पाठिंबा द्यायला निघाले, तेव्हा सामनामधून तुम्ही टीका केली. या लेखणीचा जगात सर्वांत जास्त दुरुपयोग सामनामधून करण्यात आला. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या लेखणीचा उपयोग कधी झाला नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
दरम्यान, पंतप्रधान मोदी देशवासीयांच्या हृदयात पोहोचत असल्यामुळे विरोधकांना आणि घराणेशाहीवाल्यांना दुःख होणे स्वाभाविक आहे. यांच्या दुःखावर २०२४ मध्ये जनता पराभवाची फुंकर घालण्याचे काम करेल, असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.