कोणत्याही क्षणी 'गोड' बातमी; सुधीर मुनगंटीवार प्रचंड आशावादी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 07:59 PM2019-12-09T19:59:18+5:302019-12-09T20:00:14+5:30
करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचे लग्न काल माढ्यात पार पडले.
मुंबईः करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचे लग्न काल माढ्यात पार पडले. या निमित्ताने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवारांनी पुन्हा एकदा गोड बातमी येणार असल्याचं टीवी 9ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लवकरच गोड बातमी महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे. कोणत्याही दिवशी, कोणत्याही महिन्यात ती येऊ शकते. आजची अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट म्हणजे सरकारला कोणत्याही क्षणी स्थगिती मिळू शकते, असे सूतोवाचही मुनगंटीवारांनी केले आहेत.
तर त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडीचाही खरपूस समाचार घेतला आहे. या युतीचा जन्मच मुळात कामाच्या आधारावर किंवा विकासाच्या नावावर झालेला नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचा जन्म सत्तेच्या महत्त्वाकांक्षेपायी झाला आहे. महाराष्ट्र आघाडीचा जन्म जनादेशाचा अवमान करत, महाराष्ट्राचा अपमान करत झालेला आहे, असं म्हणत मुनगंटीवारांनी टीकास्त्र सोडलं आहे. खातेवाटप हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे. सरकार स्थापन करायला उशीर, कामाची सुरुवात व्हायला उशीर, मला वाटतं की चिऊताई चिऊताई दार उघडची कथाच संपून जाईल आणि म्हणून आमच्या सदिच्छा आहेत, असा उपरोधिक टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
खडसेंच्या बंडावर ते म्हणाले, खडसे, बावनकुळे, तावडे, मेहताजी असतील हे भाजपाचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. ज्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. त्यांनी आयुष्यभर भाजपाच्या विस्तारासाठी, पक्षवाढीसाठी जिवाचं रान केलं आहे. काही गोष्टींच्या संदर्भात नाराजी असेल, तर ती दूर करण्याचाच प्रयत्न होईल, असंही ते म्हणाले आहेत.