विनाशकाले विपरित बुद्धी! सर्व पर्याय खुले म्हणणाऱ्या शिवसेनेवर मुनगंटीवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 07:17 PM2019-10-29T19:17:44+5:302019-10-29T19:18:44+5:30
विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र सत्तेतील अधिकारांच्या वाटपावरून दोन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू झाली आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र सत्तेतील अधिकारांच्या वाटपावरून दोन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, सत्तास्थापनेसाठीचे सर्व पर्याय खुले आहेत, असे सांगणाऱ्या शिवसेनेवर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे. महायुती करून निवडणूक लढवल्यानंतर शिवसेनेने सर्व पर्याय खुले आहेत, असं म्हणणं म्हणजे विनाशकाले विपरित बुद्घी असल्याचे मुनगंटीवारी यांनी म्हटले आहे.
सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेनेकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्याबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ''दुष्यंत चौटाला हे निवडणुकीपूर्वी आघाडीमध्ये सामील नव्हते. मात्र शिवसेना आणि भाजपाची निवडणूकपूर्व युती होती. अशी युती ही एंगेजमेंटसारखी असते. आता शिवसेनेकडे सर्व पर्याय खुले असतील, तर आमच्याकडेही पर्याय खुले आहेत.''
दरम्यान, आज भाजपा आणि शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द फिरवल्यामुळे बैठक रद्द करण्यात आली असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री पदाच्या बोलणीसाठी आज दुपारी 4 वाजता मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेनेकडून सुभाष देसाई, संजय राऊत आणि भाजपाकडून भूपेंद्र यादव, प्रकाश जावडेकर यांच्यात यासंदर्भात चर्चा होणार होती. मात्र, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी शिवसेना आणि भाजपामध्ये 50-50 फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीदरम्यान ठरला होता. मात्र, मुख्यमंत्री म्हणतात की, असे काही ठरलेच नव्हते. मग, लोकसभेवेळी असे काय ठरले होते, असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.