लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? मुनगंटीवार म्हणाले, " चर्चा करुन भाऊबीजेपर्यंत..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 03:27 PM2024-12-02T15:27:59+5:302024-12-02T15:28:37+5:30
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.
Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असून या सरकारचा ५ डिसेंबर रोजी शपथविधी पार पडणार आहे. मात्र मुख्यमंत्री पदी कोण बसणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे, लाडकी बहीण योजनेमुळे मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याची कबुली महायुतीच्या नेत्यांनी दिलली होती. निवडणुकीआधी महायुतीच्या नेत्यांनी महिलांना १५०० ऐवजी २१०० रुपये देण्याची घोषणा जाहीरनाम्यातून करण्यात आली होती. मात्र आता निकालानंतर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. २,१०० रुपये दिले नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल, असं विधान मुनगंटीवार यांनी केलं आहे.
निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर जवळपास २.५ कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला १५०० रुपये जमा केले होते. जुलै ते नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळाले. मात्र, आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचे पैसे निवडणुकीनंतर देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आता महिला लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. अशातच सुधीर मुनगंटीवार यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये महत्त्वाचे विधान केलं आहे.
मुलाखतीदरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्येक महिलेसाठी योजनेची मर्यादा १,५०० रुपयांवरून २,१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचे तुमचे वचन तुम्ही पाळाल का? कारण तुमचे एक सहकारी हे एकनाथ शिंदे यांचे वचन होते असं म्हणत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना २,१०० रुपये दिले नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं.
हे १०० टक्के होईल. जर आम्ही महिलांना दिली जाणारी रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये वाढवली नाही आणि जर आम्ही आमचे वचन पूर्ण केले नाही तर हे संपूर्ण देशासमोर एक उदाहरण ठरेल की आम्ही आमच्या वचनाला मुकलो आहोत. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला हवं. महाराष्ट्र जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातील आश्वासने धुळीला मिळू देणार नाही. आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला २,१०० रुपये देण्याची क्षमता आहे. मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
"वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार यावर चर्चा केली जाईल. जानेवारी की जुलै कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाणार आहे. आम्ही मागील वेळी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती, त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेच्या दरम्यान ती वाढवू शकतो," असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.
तसेच योजनेची रक्कम वाढवल्याने तिजोरीवर किती बोजा वाढणार आहे याबाबतही मुनगंटीवारांनी भाष्य केलं. "आम्हाला दरवर्षी द्याव्या लागणाऱ्या सातव्या वेतन आयोगाच्या रकमेपेक्षा हे प्रमाण कमी असेल. महिलांना पैसे देण्याच्या बाबतीत लोक हे प्रश्न का विचारतात? ३००० कोटी रुपयांची जमीन व्हिडीओकॉनला ३० कोटींना देण्यात आली तेव्हा कोणीही प्रश्न विचारले नाही," असं मुनगंटीवारांनी म्हटलं.