राजीनामा मागण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना - सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 06:25 AM2018-11-07T06:25:10+5:302018-11-07T06:25:20+5:30

यवतमाळ जिल्ह्यात वनविभागाने ठार मारलेल्या ‘टी-१ अवनी’ या वाघिणीच्या मृत्यूवरून भाजपाच्या दोन मंत्र्यांमध्ये आता चांगलीच जुंपली आहे.

Sudhir Mungantiwar News | राजीनामा मागण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना - सुधीर मुनगंटीवार

राजीनामा मागण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना - सुधीर मुनगंटीवार

Next

मुंबई  - यवतमाळ जिल्ह्यात वनविभागाने ठार मारलेल्या ‘टी-१ अवनी’ या वाघिणीच्या मृत्यूवरून भाजपाच्या दोन मंत्र्यांमध्ये आता चांगलीच जुंपली आहे. वनखात्याला वाघिणीला ठार मारण्याची हौस नव्हती, असे सांगत माझा राजीनामा मागण्याचा अधिकार फक्त पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आहे, असा टोला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना लगावला आहे.
वाघिणीला ठार न मारता तिला जिवंत पकडता येऊ शकले असते. पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उताविळपणामुळे तिचा नाहक बळी गेल्याचा आरोप करत, मुनगंटीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याचे वृत्त आहे. हे प्रकरण आपण पक्षीय पातळीवर उपस्थित करू, असेही मनेका यांनी म्हटले आहे.
यावर वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, मनेका गांधी यांना माझा राजीनामा मागण्याचा काहीच अधिकार नाही. तो अधिकार पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना आहे. १३ जणांचे बळी घेणाऱ्या वाघिणीला पकडण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न वनखात्याने केले होते. मात्र, तिला जेरबंद करताना हल्ला केल्याने गोळी घातली गेली, असे स्पष्टीकरण वनमंत्र्यांनी दिले.
मनेका गांधींच्या मतदारसंघातही वाघाला मारण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी या घटनेची पूर्ण माहिती घेऊन बोलावे आणि कुपोषित बालकांच्या पालनपोषणाकडे जरा लक्ष द्यावे, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

‘बिर्ला-अंबानी’साठी वाघिणीची शिकार

बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच सरकारने अवनी वाघिणीची शिकार केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. वन्य कायद्यानुसार एखादा वन्य प्राणी हिंसक झाला तर त्याला बेशुद्ध करून पकडणे असा नियम आहे. अवनीच्या बाबतीत मात्र सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आले. अवनीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार करण्यात आलं ही बाब निषेधार्ह आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मात्र, पाटील यांचा हा आरोप मुनगंटीवार यांनी खोडून काढला आहे.

Web Title: Sudhir Mungantiwar News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.