Delhi Election Results: केजरीवालांच्या तोडीस-तोड उमेदवार देण्यास कमी पडलो; मुनगंटीवारांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 12:57 PM2020-02-11T12:57:17+5:302020-02-11T12:58:24+5:30
मताचे स्पष्टपणे ध्रुवीकरण सुरु झाले आहेत, असेही ते म्हणाले.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जनतेसमोर येण्यास सुरुवात झाली आहे, तर काही तासात निकाल हाती येणार आहे. त्यामुळे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत असून, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत केजरीवालांच्या तोडीस-तोड उमेदवार देण्यास आम्ही कमी पडलो असल्याची कबुली भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार दिली आहे.
एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले की, दिल्लीत सत्तास्थापन करण्याइतके आम्हाला यश मिळाले नाही. मात्र 3 जागांवरून 18 ते 20 जागा आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तब्बल सहापटीने आम्ही पुढे गेलो आहेत. तसेच हे खरं आहे की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात तोडीस-तोड उमेदवार देण्यास आम्ही कमी पडलो असल्याची कबुली सुद्धा त्यांनी यावेळी दिली.
दिल्लीतील लोकसभा निवडणुकीत मतदारांनी 7 पैकी 7 जागांवर निवडून दिले होते. तर स्थानिक निवडणुकीत सुद्धा भाजपचाच विजया झाला होता. या निवडणुकीत मात्र 18 ते 20 जागांपर्यंत आमचा पक्ष पोहचला आहे. मात्र 15 वर्षे सत्तेत असलेली काँग्रेस शून्यवर पोहचली. त्यामुळे मताचे स्पष्टपणे ध्रुवीकरण सुरु झाले आहेत, असेही ते म्हणाले.