"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 03:46 PM2024-06-02T15:46:21+5:302024-06-02T15:48:23+5:30

Chandrapur Loksabha Constituency : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील एक्झिट पोल समोर येताच भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक विधान केलं आहे.

Sudhir Mungantiwar statement after Chandrapur Loksabha Constituency exit poll | "निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान

"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान

Sudhir Mungantiwar : लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर शनिवारी संध्याकाळी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहे. विविध एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलनुसार अनेक तगड्या उमेदवारांचा पराभव होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर असल्याचा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवला आहे. या निकालामुळे आता भाजपचं टेंशन वाढलं आहे. तर दुसरीकडे, पराभवानंतर खचनार नाही, असं विधान मुनगंटीवार यांनी केलंय. त्यामुळे आता मुनगंटीवार यांची निराशेची भाषा कशासाठी अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर देशभरात एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात भाजपचे ४५ पेक्षा अधिक जागा मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे दिसतंय. तसेच भाजपच्या बड्या उमेदवारांनाही धक्का बसण्याची शक्यता आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर बाजी मारण्याची शक्यता आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांच्या पराभवाची शक्यता काही एक्झिट पोलने वर्तवली आहे. याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक लढवण्यासाठी मी तयार नव्हतो, असं विधान केलं आहे.

पराभव अटल बिहारी, इंदिरा गांधी यांचाही झाला होता अशी सूचक प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपा माझासोबत बोलताना दिली. "चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो. पण पक्षाचा आदेश आला आणि ही जागा लढवली. आनंदाची गोष्ट आहे की एक्झिट पोलच्या सर्व्हेमधून जनतेच्या मनातील भावना व्यक्त झाली. मला वाटत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासावर मतं मागितली. हा देश म्हणजे माझा परिवार आहे, या भावनेने त्यांनी काम केलं. या देशातील जनतेनं ४ जून रोजी पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने कौल उभा केला तर देशाचा जास्त फायदा आहे," असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

"अमित शाह यांनी म्हटलं होतं की, आम्ही कितीतरी पराभव सहन केले आहेत. मला वाटतं आमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांची भूमिका समजून घेतली पाहिजे. शेवटी पक्षाचा विजय आणि पराभव यावर पक्षाचं भवितव्य अवलंबून राहत नाही. तर संघटना, विचार, पक्षाचं संघटन यावरही अवलंबून असतं. त्यामुळे एखादा पराभव होतो. देशात अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी यांनाही पराभवाला सामोर जावं लागलं होतं. मात्र, पराभवानंतरही त्यांनी नैतिकतेमध्ये कणभरही फरक पडू दिला नाही. पण राहुल गांधींना पराभव झाला की जाती दिसतात," असेही मुनगंटीवार म्हणाले.

Web Title: Sudhir Mungantiwar statement after Chandrapur Loksabha Constituency exit poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.