सुधीर नाईक यांनी राजीनामा दिला
By admin | Published: July 1, 2016 05:03 AM2016-07-01T05:03:52+5:302016-07-01T05:03:52+5:30
तब्बल तीन दशके मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये काम करणारे अनुभवी पिच क्युरेटर सुधीर नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई : तब्बल तीन दशके मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये काम करणारे अनुभवी पिच क्युरेटर सुधीर नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माजी कसोटीपटू असलेल्या सुधीर यांचा मुंबई क्रिकेट असोसिएशनसह (एमसीए) असलेला दोन वर्षांचा करार ३१ मे ला समाप्त झाला होता. यानंतर त्यांनी संघटनेला पत्र लिहून हा करार न वाढवण्याबाबत सांगितले.
गतवर्षी वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पाचव्या व अंतिम सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवास सामोरे जावे लागले होते. त्या वेळी खेळपट्टीवर जोरदार टीका करताना तत्कालीन संघ निर्देशक रवी शास्त्री यांनी सुधीर यांच्याशी वाद घातला होता. या वेळी शास्त्री यांनी आपल्याला अपशब्द वापरले, असा आरोप यांनी सुधीर यांनी केला होता. हा वाद चांगलाच रंगला होता. आपल्या राजीनाम्याबद्दल ७१ वर्षीय सुधीर यांनी सांगितले की, ‘‘माझे वय खूप झाले असून या वयामध्ये पिच क्युरेटरची जबाबदारी सांभाळणे माझ्यासाठी कठीण आहे. मी माझ्या कामाचा पुरेपूर आनंद घेतला आहे. मात्र माझ्या मते आता मी अजून काम करू शकणार नाही. याबाबतीत मी एमसीएला पत्राद्वारे पद सोडत असल्याचे कळवले आहे.’’
दरम्यान, याविषयी एमसीएचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी दुजोरा देताना सांगितले की, ‘‘सुधीर यांचे राजीनामापत्र मिळाले असून, लवकरच नव्या पिच क्युरेटरची नियुक्ती करण्यात येईल.’’ यानंतर सुधीर यांचे सहकारी म्हणून काम पाहिलेले महमुनकर यांची एमसीएचे नवे पिच क्युरेटर म्हणून निवडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(क्रीडा प्रतिनिधी)
>पिच क्युरेटर : तीन दशकांचा प्रदीर्घ अनुभव