सुधीर तांबे यांच्यावर खुनाचा गुन्हा
By Admin | Published: March 26, 2016 01:11 AM2016-03-26T01:11:38+5:302016-03-26T01:11:38+5:30
संगमनेर महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेच्या १९९१ साली भाजून झालेल्या मृत्यूप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तब्बल २५ वर्षांनी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि पुण्यातील सूर्या हॉस्पिटलचे
पुणे : संगमनेर महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेच्या १९९१ साली भाजून झालेल्या मृत्यूप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तब्बल २५ वर्षांनी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि पुण्यातील सूर्या हॉस्पिटलचे डॉ. जयसिंग शिंदे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा तपास पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्राध्यापिका विजया देशमुख यांचा १९९१ साली भाजून मृत्यू झाला होता. रहात्या घरी ३५ भाजलेल्या देशमुख यांना डॉ. तांबे यांच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांना पुण्यातील सुर्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविलेल्या मृत्यूपूर्व जबाबात स्टोव्हच्या भडक्यामुळे आपण भाजलो असून कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे विजया देशमुख यांनी म्हटले होते.
फरासखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन या गुन्ह्याची कागदपत्रे संगमनेर पोलिसांकडे पाठवून दिली होती. त्यानंतर १९९४-९५ च्या काळात देशमुख यांच्या नातेवाईकांनी डॉ. तांबे आणि डॉ. शिंदे यांच्या दुर्लक्षामुळे विजया यांचा मृत्यू झाल्याची जनहित याचिका दाखल करीत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, या याचिकेवर निर्णय होण्याआधीच ती मागेही घेण्यात आली.
दरम्यान, २००८ मध्ये सामाजिक कार्यकर्ते हेमंत यशवंत ढगे (वय ३४, रा. हडपसर) यांनी उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात पुन्हा जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. सर्वोच्च न्यायालयाने पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी फरासखाना पोलिसांना १९ मार्च रोजी कलम १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी कलम भा.द.वि. ३०२, २०१,३४ (खून, पुरावा नष्ट करणे आणि संगनमत) या कलमान्वये डॉ. तांबे आणि डॉ. शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ढगे यांनाच फिर्यादी केले आहे.
माजी मंत्री थोरात यांचे म्हणणे-
हेमंत ढगे यांनी केवळ ऐकिव माहितीवर ही खासगी फिर्याद दाखल केली असून त्यात काहीही तथ्य नाही. सदर महिलेच्या मृत्युची संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यू म्हणून नोंद असून उपविभागीय दंडाधिकारी यांनीदेखील सदर मृत्यू अपघाती मृत्यू असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे पोलीस अधिकारी यांनी वेळोवेळी केसची चौकशी करून कोर्टास अहवाल सादर केलेला आहे, असा खुलासा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत थोरात यांनी सांगितले की, पहिली चौकशी पुर्णत: ग्राह्य धरून सहा महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करून तांत्रिकदृष्टया एफआयआर दाखल करावा व तसा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे सुप्रिम कोर्टाच्या आदेशात म्हटले असल्याचे थोरात यांचे म्हणणे आहे.
सदर प्रकरणाच्या पाठिमागे अहमदनगर जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याचा हात असून पक्षातील सहकाऱ्याची समाजातील प्रतिमा डागाळण्याचा व राजकीय स्पर्धेतून त्यांना दूर करण्याचा त्यांचा हेतू आहे, असा आरोपही थोरात यांनी केला आहे. मात्र, तो नेता कोण, याचा नमोल्लेख त्यांनी टाळला आहे.
काय आहे फिर्याद?
डॉ. सुधीर तांबे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे आहेत. ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाळासाहेब थोरात आणि प्रा. विजया देशमुख यांचे संबंध होते. थोरात यांना मुलगा होत नसल्यामुळे देशमुख यांच्याशी त्यांनी संबंध ठेवलेले होते. मात्र, पत्नीपासून मुलगा झाल्यानंतर त्यांनी विजया देशमुख यांच्यासोबत असलेले संबंध तोडले. थोरात हे एक प्रतिष्ठित व्यक्तीमत्व असल्याने भाजलेल्या प्रा. देशमुख यांना जाणीवपूर्वक डॉ. तांबे यांच्या दवाखान्यात हलवण्यात आले. तेथून पुण्याला डॉ. जयसिंग शिंदे यांच्या सुर्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. काही दिवसांनी उपचार बंद करण्यात आल्यामुळे देशमुख यांचा मृत्यू झाला, असा आरोप ढगे यांनी फिर्यादीमध्ये केला आहे.