तिघांच्या आत्महत्यांचे दु:ख झेलत तिने सावरले कुटुंब!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 06:09 AM2022-03-08T06:09:16+5:302022-03-08T06:09:26+5:30
Womens Day: कर्जाच्या बाेजाखाली सासऱ्याने आत्महत्या केली. त्यापाठोपाठ दिराने आणि पतीनेही आत्महत्येचा मार्ग पत्करला. एकाच कुटुंबात तीन कर्त्या पुरुषांच्या आत्महत्या झाल्या.
नितीन गव्हाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जाच्या बाेजाखाली सासऱ्याने आत्महत्या केली. त्यापाठोपाठ दिराने आणि पतीनेही आत्महत्येचा मार्ग पत्करला. एकाच कुटुंबात तीन कर्त्या पुरुषांच्या आत्महत्या झाल्या. हे आभाळाएवढं दु:ख सहन करीत ‘ती’ने परिश्रमाचा मार्ग पत्करला. शेतीच नव्हे, तर संसारही नेटाने सांभाळला. हे बळ अंगी आणणाऱ्या ‘ती’च्या कर्तृत्वाचा झेंडा पंचक्राेशीत फडकत आहे. अविश्वसनीय वाटणारी ही संघर्ष गाथा आहे कट्यारच्या ज्याेती संतोष देशमुख यांची. २९ एकर शेती, कशी कसायची, कर्जाचा डाेंगर कसा कमी करायचा, याची चिंता होती. परंतु त्यांनी हार मानली नाही.
हाती ट्रॅक्टरचे स्टेअरिंग
ज्याेतीताई नव्या उमेदीने कामाला लागल्या. मुलगा हेमंत याला कॉम्प्युटर इंजिनिअर बनविले. मुलगा सध्या पुण्यात नोकरीला आहे. शेती मशागतीसाठी २०१७ मध्ये त्यांनी ट्रॅक्टर घेतला. सर्व अवजारे घेतली आणि ट्रॅक्टरचे स्टेअरिंग स्वत:कडे घेत, शेतीची कामे केली. शेती करतानाच २०१० मध्ये शासनाने त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून रुजू करून घेतले. हे काम करताना त्यांनी घर, शेतीही सांभाळली.
जिजाऊ माँसाहेबांनी राज्याची धुरा सांभाळत छत्रपती शिवाजींना घडविले. महिला ही आदिशक्ती आहे, तिने स्वत:ला कमी समजू नये. कितीही संकटे आली, तरी महिलांनी खचू नये.
- ज्योती देशमुख,
शेतकरी, कट्यार