नापास झाल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्त्या : नैराश्य टाळा
By admin | Published: June 14, 2017 01:47 PM2017-06-14T13:47:54+5:302017-06-14T13:47:54+5:30
परिक्षेत नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून नाशिकमधील सिध्दपिंप्री गावातील एका विद्यार्थ्याने आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली.
नाशिक : दहावीच्या शालांत परिक्षेत नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून नाशिकमधील सिध्दपिंप्री गावातील एका विद्यार्थ्याने आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. सदर विद्यार्थ्याचा मृतदेह गावाच्या शिवारातील एका विहिरीत मध्यरात्रीच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दहावीच्या परिक्षेच्या निकालाचा कुठलाही तणाव व नैराश्य विद्यार्थ्यांनी बाळगू नये, असे थेट आवाहन नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र गोधने, सचिव राजेंद्रप्रसाद मारवाडी यांनी केले आहे. दहावीच्या परिक्षेत जरी एक किंवा दोन विषयांत विद्यार्थी नापास जरी झाला असला तरी त्याला जुलै महिन्यात पुरवणी परिक्षा देऊन उत्तीर्ण होता येते. तसेच परिक्षेपुर्वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीलादेखील प्रवेश मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनावर कुठलाही ताण न घेता भीती न बाळगता जिद्दीने अभ्यास करून दहावीची परीक्षा उत्तीर्ण करावी.
संजय केदू कराटे (१६) हा मंगळवारी दुपारी खेळत होता. मात्र जेव्हा त्याला दहावीचा निकाल समजला तेव्हा त्याने नैराश्यात येऊन गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत जाऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली. दिवसभर संजय घरी परतला नाही त्यामुळे संध्याकाळनंतर त्याच्या नातेवाईकांनी परिसरात त्याचा शोध सुरू केला. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास सार्वजनिक विहिरीत त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.