साखर निर्यातीचे धोरण हवे
By Admin | Published: January 18, 2016 12:54 AM2016-01-18T00:54:31+5:302016-01-18T00:55:01+5:30
शरद पवार : शेती विकासाचे राजकारण करूया; सा. रे. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण
शिरोळ : साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखर निर्यातीचे धोरण राबविले पाहिजे, त्याशिवाय बाजारभाव सुधारून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर मिळणार नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे सांगतानाच शेतीवर परिणाम होणारे राजकारण करू नका, शेती उत्पादन वाढीबरोबर शेतकऱ्यांच्या विकासाला दिशा देणारे राजकारण करूया, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी येथे केले.
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक, माजी अध्यक्ष, स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी सा. रे. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील होते.
त्यानंतर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शर्करा औद्योगिक श्रमिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन, तर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन माजी वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
खा. पवार पुढे म्हणाले, देशामध्ये उसाचे सरासरी एकरी उत्पादन २९ टनांचे आहे. यात महाराष्ट्राचे ३४ टन असून, दत्त कारखान्याचे ४३ टन आहे, हे वेगळे वैशिष्ट आहे. कारखान्याने पुरस्कारांचा तर विक्रमच केला आहे.
‘दत्त’मुळे कारखानदारीला दिशा
स्व. सा. रे. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत खा. शरद पवार म्हणाले, खऱ्या अर्थाने साखर कारखानदारीला दिशा देण्याचे काम सा. रे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दत्त कारखान्याच्या प्रांगणातून झाले आहे. सामान्य माणूस शक्तिशाली बनला पाहिजे, ही भूमिका त्यांची होती. या दूरदृष्टीतूनच दत्त कारखान्याला त्यांनी ऊर्जितावस्था दिली. श्रीवर्धन बायोटेकमधील फूलशेती देशातील आदर्श असून, स्व. सा. रे. पाटील यांच्यानंतर त्यांचे पुत्र गणपतराव पाटील यांनी तोच आदर्श कायमपणे ठेवला आहे.
कमी पाण्यावरील उसाचे तंत्रज्ञान आणणार
आज साखर कारखानदारीसमोर मोठे प्रश्न उभे आहेत. ब्राझील, इस्रायल, इंडोनेशिया सारख्या देशांतील साखर उत्पादन व ऊसदर यांचा विचार करता आपल्या देशातही आधुनिक तंत्रज्ञान राबविण्याची गरज आहे. केवळ साखर उत्पादन उपयोगाचे नसून, एकरी ऊस उत्पादन वाढले पाहिजे. यासाठी कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन देणारे परदेशातील ऊस बियाणांचे आधुनिक तंत्रज्ञान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत राबविण्याचा ठोस कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.