साखर निर्यातीपोटी साडेआठ कोटी
By Admin | Published: March 26, 2016 12:26 AM2016-03-26T00:26:36+5:302016-03-26T00:26:36+5:30
गतवर्षी उत्पादित केलेली कच्ची साखर निर्यात करण्यासाठी राज्य शासनाकडून साखर कारखान्यांना तब्बल ८ कोटी ३१ लाख ४९ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील ७ साखर
पुणे : गतवर्षी उत्पादित केलेली कच्ची साखर निर्यात करण्यासाठी राज्य शासनाकडून साखर कारखान्यांना तब्बल ८ कोटी ३१ लाख ४९ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील ७ साखर कारखान्यांना अनुदानाचे हे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची थकीत असलेली एफआरपी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गतवर्षी २०१४-१५मध्ये राज्यातील कारखान्यांनी विक्रमी साखरेचे उत्पादन केले होते. त्यामुळे देशाअंतर्गत बाजारात साखरेचे दर वाढले होते. त्यामुळे देशात त्याचे विपणन केल्यास कारखान्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे साखर कारखान्यांकडून कच्ची साखर निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या साखरेला चांगले भाव आहेत. ते मिळावेत आणि कारखान्यांनी साखर निर्यात करावी यासाठी राज्य शासनाने साखर कारखान्यांना प्रत्येक मेट्रीक टनामागे एक हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय जून २०१५मध्ये घेतला होता. त्यासाठी २० कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी १४ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
हे अनुदान वितरित करण्यासाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्यस्तरीय साखर निर्यात अनुदान समितीची बैठक झाली. त्यामध्ये हे पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला. गतवर्षीची एफआरपी काही साखर कारखान्यांनी थकीत ठेवली होती. ती देण्यासाठी कारखान्यांना काही सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार हे साडेआठ कोटी रुपयांचे अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली. सर्वाधिक २ कोटी ४९ लाख ८३ हजार ५०० रुपये हिंगोलीच्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याला मिळणार आहेत. त्यापाठोपाठ २ कोटी ५ लाख ४० हजार रुपये कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू कारखान्याला देण्यात आले.
अनुदान मिळणारे हे आहेत कारखाने
साखर कारखानेअनुदानाची रक्कम
मुक्तेश्वर शुगर्स, औरंगाबाद५६,२७,०००
भाऊसाहेब थोरात कारखाना, अहमदनगर१,२९,२२,०००
पूर्णा कारखाना, हिंगोली२,४९,८३,५००
जयवंत शुगर्स, सातारा६७,८०,०००
जकराया शुगर्स, सोलापूर६७,२८,०००
श्री छत्रपती शाहू कारखाना, कोल्हापूर२,०५,४०,०००
श्री अगस्ती कारखाना, अहमदनगर५५,६८,०००