साखर कारखाने आजपासून बंद; कारखानदारांच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 03:09 AM2018-10-31T03:09:35+5:302018-10-31T06:59:41+5:30
शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगाम चालविणे अडचणीचे आहे.
कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगाम चालविणे अडचणीचे आहे. त्यामुळे तुटलेला ऊस गाळप करुन आज, बुधवारपासून कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय साखर कारखानदारांच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.
‘रयत क्रांती’ शेतकरी संघटनेने एफआरपी अधिक २०० रुपये, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने विनाकपात ३२१७ रुपये, तर शेतकरी संघटनेने एकरकमी ३५०० रुपयांची मागणी केली आहे. जिल्ह्यातील संताजी घोरपडे, ‘राजाराम’सह इतर कारखान्यानी गळीत हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी तोडण्या रोखण्यास सुरुवात केल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्याने सीमाभागातील ऊस तिकडे जात आहे. त्याचा फटका येथील कारखान्यांना बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
सध्या साखरेचा दर २९ रुपये आहे. बॅँकांकडून ८५ टक्क्यांप्रमाणे मिळणारी उचल आणि शेतकरी संघटनांची मागणी यांचा ताळमेळ बसत नाही. ऊसतोडणी-वाहतूक खर्च, मागील हंगामातील कर्जाचे हप्ते द्यावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या मागण्यांप्रमाणे सध्या तरी दर देणे अशक्य असल्याने हंगाम बंद ठेवणेच योग्य होईल. अशा परिस्थितीत शासनाने मदत करावी, त्यांच्या मदतीशिवाय हंगाम सुरू होणे अशक्य असल्याचे कारखानदारांनी सांगितले.