“कारखाना हे राजकारण नाही तर हा धंदा आहे”; शरद पवारांनी टोचले ऊस उत्पादकांचे कान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 07:59 PM2021-11-14T19:59:28+5:302021-11-14T19:59:45+5:30
ऊसाचा टनाला जितका भाव मिळतोय त्यापेक्षा इथनॉलला दुपटीने भाव मिळेल हे मी खात्रीने सांगतो असं शरद पवार म्हणाले.
नाशिक - शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीत बदल करत ऊसाला अधिक उतारा कसा मिळेल यासाठी दर्जेदार ऊस उत्पादनावर शेतकऱ्यांनी भर द्यावा तसेच कारखानदारी यशस्वी होण्यासाठी केवळ साखर उत्पादन न करता इथेनॉल, वीज आणि हायड्रोजन उत्पादन करावे असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांनी केले आहे.
रानवड येथे स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंत संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि. काकासाहेब नगर रानवड या कारखान्याचा ३९ वा गळीत हंगाम शुभारंभावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, साखर काढून हा धंदा टिकणार नाही. वीज निर्मिती करण्याचा विचार केला पाहिजे वीज निर्मिती बाबत आम्ही राज्यातील मंत्र्यांशी बोलू मार्ग काढू. वीज निर्मिती साठी कारखाने पुढे आले ही आनंदाची बाब आहे. अनेक वाहन ही इथेनॉल मध्ये आणलीय, बाहेरच्या देशात हे होतंय तर आपल्याकडे होईल. ऊस हे महत्वाचे पीक तसे आळशांचे पीक आहे. उसाचे पीक घेतले की गडी त्याकडे लक्ष देत नाही. द्राक्ष पीक घेतले तर त्याकडे लक्ष दिले जाते. उसाची लागण केली तर त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. लागण झाली की नाशिकला जाऊन बसतो. सगळ्या जगाची चर्चा करत बसतो, उसाचे काय झालं त्याकडे लक्ष देतो. निवडणूक आणि बाकीच्या गोष्टीकडे लक्ष घालता अशा शब्दात त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कान टोचले आहेत.
तसेच ऊसाचा टनाला जितका भाव मिळतोय त्यापेक्षा इथनॉलला दुपटीने भाव मिळेल हे मी खात्रीने सांगतो. वीज आणि हायड्रोजन तयार करण्याचा प्रयत्न करता येईल. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर ती भरपाई करण्याची हिंमत ठेवली पाहिजे. कारखाना हे राजकारण नाही तर हा धंदा आहे. जगाला साखर पुरवण्याची जबाबदारी महाराष्ट्राची आहे. जगाला साखर देणारे देश अडचणीत आलेत. त्यामुळे चांगल्या दर्जाचा उस निर्माण केला पाहिजे, त्याचा उतारा चांगला काढला पाहिजे. ब्राझीलचा कारखाना हा जसे काम करतो तसे काम करावे लागेल. ते कारखाने ३५ हजार टन उस गाळप करतात. निवडणूक आली की किंमत करू नका. कारखाना सुरू केला की कामगारांना चांगला पगार द्या. कारभार चांगला करा, संस्था तोट्यात जाणार नाही याचा विचार करा असा सल्लाही शरद पवारांनी दिला आहे.