साखर उद्योगाला कामगार टंचाई ?
By admin | Published: October 14, 2016 02:22 AM2016-10-14T02:22:38+5:302016-10-14T02:22:38+5:30
साखर गाळप हंगामाची तारीख १ डिसेंबरऐवजी १ नोव्हेंबर करावी, अशी मागणी जोर धरत असून, विविध साखर कारखान्यांनी तशी लेखी मागणी साखर आयुक्तालयाकडे केली असल्याचे
विशाल शिर्के / पुणे
साखर गाळप हंगामाची तारीख १ डिसेंबरऐवजी १ नोव्हेंबर करावी, अशी मागणी जोर धरत असून, विविध साखर कारखान्यांनी तशी लेखी मागणी साखर आयुक्तालयाकडे केली असल्याचे समजते. कर्नाटकचा गाळप पंधरा दिवस लवकर सुरू होत असल्याने, ऊसतोडणी कामगारांची टंचाई जाणवू शकते, त्यामुळे हंगाम लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे यंदा केवळ ४४५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. त्यातून ५०.२८ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे, तसेच यंदा १४५ साखर कारखाने सुरू होतील, अशी शक्यता आहे. दर वर्षी साधारणत: १५ आॅक्टोबरपासून साखर कारखान्यांची धुराडी पेटतात. नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात हंगामास जोर येतो. यंदा मंत्रिसमितीने १ डिसेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
परंतु साखर कारखान्यांनीच लवकर हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी साखर आयुक्तालयाकडे केली आहे. कर्नाटकने १५ नोव्हेंबरपासून गाळप सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने, विशेषत: सोलापूर, कोल्हापूर, सांगली या कर्नाटकच्या सीमेजवळील कारखान्यांकडून या मागणीने उचल खाल्ली आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या प्रस्तावांचा विचार करून सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.