ऊस दराबाबत साखर कारखानदारांचे मौनच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 04:06 AM2019-11-30T04:06:23+5:302019-11-30T06:49:42+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी, एफआरपी अधिक २०० रुपये कारखानदारांनी जाहीर करुन गळीत हंगाम सुरु करण्याचे आवाहन केले होते.
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी, एफआरपी अधिक २०० रुपये कारखानदारांनी जाहीर करुन गळीत हंगाम सुरु करण्याचे आवाहन केले होते. सांगली जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले आहेत. पण, एकाही कारखान्याने दराची घोषणा केलेली नाही. कारखानदारांच्या मौनाबाबत शेतकऱ्यांमध्येही उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.
महापूर आणि अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादकांसह सर्वच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये उसाला दर किती असणार, याकडे शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे. कारखानदार गळीत हंगाम सुरु करताना दराची नेहमीच घोषणा करतात. पण, यावर्षी सर्वच कारखानदारांनी गळीत हंगाम सुरु करताना दराची घोषणाच केली नाही. कारखानदारांच्या या भूमिकेवर शेतकरी संघटना गप्पच आहेत. साखर कारखानदार देखील काही बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मौनामध्ये दडलंय काय, असा सवालही शेतकºयांनी उपस्थित केला आहे.
काही कारखानदारांनी तर एकरकमी एफआरपी देणे कठीण असल्याने तीन टप्प्यामध्ये देण्याचा विचार सुरु असल्याचे सांगितले. पहिल्या टप्यात ८० टक्के, दुसरे दोन टप्पे १० टक्के करण्याबाबत साखर कारखानदारांमध्ये चर्चा चालू आहे. कारखानदारांची ही भूमिका लक्षात घेतल्यास, राजू शेट्टी यांनी जाहीर केलेली एफआरपी अधिक २०० शेतकºयांच्या पदरात पडतील, अशी परिस्थिती दिसत नाही.
साखरेला ३५०० रुपये द्या : अरुण लाड
साखरेचे दर आजही प्रति क्विंटल ३१०० ते ३१५० रुपयांपर्यंतच आहेत. साखरेचे दर वाढल्याशिवाय कारखानदारांना एकरकमी एफआरपीची रक्कम देता येणार नाही. महागाई लक्षात घेतल्यास शेतकºयांनाही शेती परवडत नाही. म्हणून शासनाने साखरेचा किमान दर प्रति टन ३५०० रुपये करण्याची गरज आहे. तरच शेतकºयांना प्रति टन तीन हजारापर्यंत दर देता येणार आहे, अशी प्रतिक्रिया क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी दिली.