राज्यात साखरेच्या दरात आठ रुपयांची वाढ
By admin | Published: March 6, 2016 03:56 AM2016-03-06T03:56:05+5:302016-03-06T09:09:05+5:30
केंद्र सरकारने सक्ती केल्याने बाजारपेठेतील साखरेच्या दरात वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांत घाऊक बाजारात प्रति क्विंटल ७० ते ८० रुपयांची वाढ झाली
कोल्हापूर : दुष्काळामुळे राज्यातील साखर उत्पादन घटणार आहे, त्यातच निर्यातीसाठी केंद्र सरकारने सक्ती केल्याने बाजारपेठेतील साखरेच्या दरात वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांत घाऊक बाजारात प्रति क्विंटल ७० ते ८० रुपयांची वाढ झाली आहे. बाजारातील मागणी व उत्पादन पाहता साखर तीन हजारांवर स्थिरावेल, असा अंदाज असून किरकोळ बाजारात साखर ७ ते ८ रुपयांनी महाग होण्याची चिन्हे आहेत.
यंदाचा साखर हंगाम सुरू होण्यापूर्वी साखरेच्या दराने आतापर्यंतचा नीचांक गाठला होता. त्यानंतर प्रत्येक महिन्याला साखरेच्या दरात थोडी थोडी वाढ होत गेली. त्यात हंगामाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने एकूण उत्पादनाच्या १२ टक्के निर्यात कोटा दिल्याने त्याचा परिणामही बाजारपेठेवर झाला. त्यात दुष्काळामुळे उसाच्या उत्पादनात घट झाल्याने परिणामी साखर उत्पादन कमी होणार आहे. गत वर्षी राज्यात ९२९ लाख टन उसाचे उत्पादन झाले होते. यावर्षी कसेतरी ७०० लाख टन गाळप होईल, अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसांपूर्वी राज्यातील साखर कारखान्यांची आढावा बैठक घेऊन निर्यातीबाबत कारखान्यांना इशारा दिला होता. देशात ४० लाख टन साखर निर्यात होणार आहे. त्यापैकी नऊ लाख टनच साखर निर्यात झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सुमारे चार लाख टन साखर निर्यात झाल्याने बाजारपेठेवर त्याचा परिणाम दिसत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून घाऊक बाजारात सध्या २९७५ रुपये प्रतिक्विंटल दराने साखर विक्री होत आहे. (प्रतिनिधी)
हंगामात असे वाढले प्रतिक्विंटलचे दर -
आॅक्टोबर - २४००, नोव्हेंबर - २६००, डिसेंबर - २७००, जानेवारी - २८५०, फेबु्रवारी - २९००, मार्च - २९७५ रुपये.
> निर्यातीची केलेली सक्ती, दुष्काळामुळे उसाचे घटलेले उत्पादन यामुळे साखरेचे दर वाढू लागले आहेत. उत्पादन व बाजारपेठेतील मागणी पाहिली तर आगामी काळात तीन हजारांवर साखर स्थिरावेल.
- पी. जी. मेढे, साखर तज्ज्ञ, कोल्हापूर