देशातील साखर उत्पादनात ७१ लाख टनांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 07:00 AM2019-11-15T07:00:00+5:302019-11-15T07:00:01+5:30

पुराचा फटका : राज्यातील साखर उत्पादनात ४५ लाख टनांनी होईल घट

Sugar production in country decreases by 71 lakh tonnes | देशातील साखर उत्पादनात ७१ लाख टनांनी घट

देशातील साखर उत्पादनात ७१ लाख टनांनी घट

Next
ठळक मुद्दे राज्यातील साखरेचे उत्पादन १०७.२० लाख टनावरुन ६२ लाख टनापर्यंत घटण्याचा अंदाजमराठवाडा आणि सोलापूरात गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने येथील ३० टक्के क्षेत्र घटले

पुणे : साखर उत्पादक राज्यात निर्माण झालेली पूरस्थिती, गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने ऊस क्षेत्रात झालेली घट आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती या कारणांमुळे यंदा देशातील साखर उत्पादनामधे तब्बल ७१.६१ लाख टनांनी घट होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातील साखर उत्पादनात मोठी घट असून, महाराष्ट्रात तब्बल ४५ लाख टनांनी घट होईल. 
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने जुलै महिन्यात देशात २८२ लाख टन साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. ऑक्टोबर महिन्यात उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे ऊस क्षेत्रात ४८.३१ लाख हेक्टरपर्यंत घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी (२०१८-१९) या हंगामामध्ये ५५.०२ लाख हेक्टर ऊस क्षेत्र होते. देशातील एकूण ऊस क्षेत्रापैकी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात सुमारे ४० टक्के क्षेत्र आहे. यंदाच्या मॉन्सूनमध्ये आलेला पूर, अतिवृष्टी आणि गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने घटलेले ऊस क्षेत्र या मुळे या दोन राज्यांत ऊस पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. 
 मराठवाडा आणि सोलापूरात गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने येथील ३० टक्के क्षेत्र घटले आहे. तसेच, ऑगस्ट आणि सप्टेंबरमधे राज्यात झालेल्या पूरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, २०२८-१९ या हंगामाच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र ११.५४ लाख हेक्टरवरुन ७.७६ लाख हेक्टरपर्यंत घटले आहे. त्यामुळे यंदा राज्यातील साखरेचे उत्पादन १०७.२० लाख टनावरुन ६२ लाख टनापर्यंत घटण्याचा अंदाज आहे. 
उत्तर कर्नाटकातील बेळगाव व विजापूर जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र ५.०२ लाख हेक्टरवरुन ३.९९ लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे येथील साखर उत्पादनात गत हंगामातील ४४.३० लाख टनांवरुन ३२ लाख टनापर्यंत घट होईल. या सर्व कारणांमुळे साखरेचे उत्पादन २६८.५ लाख टन होईल. यात उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीमुळे होणारी घट लक्षात घेतलेली नाही. त्यामुळे साखरेच्या उत्पादनात आणखी साडेआठ लाख टनांची घट संभवते. म्हणजेच यंदा देशातील साखर उत्पादन २६० लाख टनांवर राहील. गेल्या हंगामात देशात ३३१.६१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. हा विचार केल्यास यंदा साखरेच्या उत्पादनात ७१.६१ लाख टनांची घट होईल. उत्तर प्रदेशात गेल्या हंगामात ११८.२१ लाख टन साखर उत्पादन झाले होते. चालू हंगामातही १२० लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे. 

Web Title: Sugar production in country decreases by 71 lakh tonnes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.