देशात साडेअकरा लाख टन साखरेचे उत्पादन : महाराष्ट्र आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 07:46 PM2018-11-19T19:46:55+5:302018-11-19T20:12:20+5:30
देशातील निम्म्याहून कमी साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून, त्यातून ११ लाख ६३ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
पुणे : देशातील निम्म्याहून कमी साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून, त्यातून ११ लाख ६३ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक वाटा महाराष्ट्राचा आहे. उत्तर प्रदेशातील साखर कारखाने उशिरा सुरु झाल्याने तेथे १५ नोव्हेंबर अखेरीस केवळ पावणेदोन लाख टन साखरेचे उत्पादन होऊ शकले आहे.
देशात ५३० ते ५५० साखर कारखाने दरवर्षी गाळप हंगाम घेतात. यंदा १५ नोव्हेंबर अखेरीस २३८ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरु झाले होते. गेल्या वर्षी याच काळात ३४९ साखर कारखाने सुरु झाले होते. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा १११ कारखान्यांचे बॉयलर अजून पेटले नाहीत. देशात आत्तापर्यंत ११.६३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात १३.७३ लाख टन साखर उत्पादित झाली होती. महाराष्ट्रात १५ नोव्हेंबर पर्यंत १०८ साखर कारखान्यातून ६.३१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. सोमवार (दि. १९) अखेरीस महाराष्ट्रातील ७२ सहकारी अणि ५७ खासगी साखर कारखाने अशा १२९ कारखान्यांचे बॉयलर पेटले होते. त्यातून ९७.८९ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ९ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. सरासरी साखर उतारा ९.२२ टक्के इतका मिळाला आहे.
उत्तर प्रदेशातील साखर कारखाने यंदा उशीरा सुरु झाले. त्यामुळे ३८ साखर कारखान्यातून १.७६ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात उत्तर प्रदेशातील ७१ साखर कारखान्यांतून ५.७६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. कर्नाटकातील ३६ साखर कारखान्यांतून १.८५ लाख टन साखर उत्पादित झाली. गेल्या वर्षी याच काळात ५९ साखर कारखान्यांमधून ३.७१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गुजरातमधील १४ कारखान्यांनी १ लाख टन, तर तमिळनाडूतील ४ साखर कारखान्यांमध्ये १५ नोव्हेंबर अखेरीस ६० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
---------------------
देशात ४ हजार लाख टन ऊस उपलब्धतेचा अंदाज
देशात ३८३८.९२ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल असा अंदाज केंद्रीय कृषी खात्याच्या सांखिकी विभागाने सप्टेंबर अखेरीसच्या आकडेवारीवरुन वर्तविला होता. राज्यात सुरुवातीस साडेनऊशे लाख टन ऊस ागळपाचा अंदाज होता. मात्र, हुमणी रोगाचा प्रादुर्भाव आणि दुष्काळी स्थिती यामुळे साडेआठशे लाख टनापर्यंत ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल असा सुधारीत अंदाज आहे. त्यामुळे त्या प्रमाणात सप्टेंबरच्या अंदाजातही काहीशी घट होईल.