राज्यात साखर उत्पादनाचा अंदाज चुकला : गेल्यावर्षी इतकेच उत्पादन होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 12:22 PM2019-04-09T12:22:41+5:302019-04-09T12:27:31+5:30
राज्यातील १०२ सहकारी व ९५ खासगी अशा १९५ साखर कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते...
पुणे : गेल्या वर्षी पावसाने दिलेली ओढ, हुमणी रोगाचा झालेला प्रादुर्भाव यामुळे राज्यात साखरेचे उत्पादन कमी होईल, असा साखर क्षेत्रातून वर्तविलेला अंदाज चुकवित यंदा देखील साखर उत्पादनाने १०७ लाख टनांच्या घरात उडी घेतली आहे. जवळपास गेल्यावर्षी इतकेच उत्पादन यंदाही होईल, असे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील १०२ सहकारी व ९५ खासगी अशा १९५ साखर कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते. रविवार (दि. ७) अखेरीस राज्यात ९४५.०६ लाख टन ऊस गाळपातून १०६ लाख १० हजार टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्यावर्षीच्या हंगामात (२०१७-१८) ९५३.७३ लाख टन ऊस गाळपातून १०७ लाख टन साखरेचे विक्रमी उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी, जून महिन्यात राज्यात सॅटेलाईट इमेजद्वारे घेतलेल्या अंदाजानुसार २५ टक्के ऊस क्षेत्र वाढल्याचे दिसून आले होते. त्यामुळे यंदा गेल्यावर्षीचा विक्रम मोडीत काढत ११० ते ११५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज वर्तविला होता.
अहमदनगर, सोलापूर, मराठवाड्यातील भागात हुमणीची तीव्रता अधिक होती. तर, कोल्हापूर, सातारा, सांगली व पुण्यामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव मध्यमस्वरुपाचा होता. दुष्काळीस्थीती व रोगाचा प्रादुर्भाव यामुळे राज्यात ९५ लाख टनांपर्यत साखर उत्पादनाचा सुधारीत अंदाज वर्तविला. हा अंदाज चुकीचा ठरवित गेल्या वर्षी इतकेच उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या हंगामात राज्याचा सरासरी साखर उतारा ११.२४ टक्के इतका होता. यंदा तो ११.२३ टक्के इतका आहे. अजूनही २९ कारखान्यांचे गाळप सुरु असल्याने, गेल्या वर्षीच्या साखर उत्पादनाच्या जवळ पोहचू असे दिसत आहे.
कोल्हापूर विभागातील ३८ कारखान्यांत २१५.२९ लाख टन ऊस गाळपातून २६.६ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. पुणे विभागातील ३२ कारखान्यांतून २०१.६५ लाख टन ऊस गाळपातून २३.३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. खालोखाल सोलापूर जिल्ह्यातील ४४ कारखान्यांनी २०५.४० लाख टन ऊस गाळपामधून २१ लाख टन व अहमदनगरमधील १८ कारखान्यांनी १४६.९६ लाख टन ऊस गाळपातून १६.२ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.