पुढील ऊस हंगामही साखरेचाच : गेल्या वर्षीपेक्षा ऊस क्षेत्रात ८० टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 07:38 PM2018-09-03T19:38:07+5:302018-09-03T19:40:01+5:30
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत नवीन ऊस क्षेत्रात ८० टक्के वाढ झाल्याने, पुढील वर्षे देखील साखरचेच ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे
पुणे : पावसाने साखर पेरणी केल्याने यंदाही ऊस क्षेत्रात मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत नवीन ऊस क्षेत्रात ८० टक्के वाढ झाल्याने, पुढील वर्षे देखील साखरचेच ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हवामान आणि योग्य पाऊसाची साथ मिळाल्यास पुढील हंगामही विक्रमी साखर उत्पादनाचा ठरेल, असे साखर क्षेत्रातून सांगण्यात येत आहे.
राज्यात कोल्हापूर आणि पुणे विभागात मिळून ६० ते ६५ टक्के उसाचे उत्पादन होते. यंदाही याच क्षेत्रातील भीमा आणि कृष्णा खोºयात चांगला पाऊस झाला आहे. कृष्णा खोºयातील कोयना, धोम, कण्हेर, वारणावती, राधानगरी, पाटगाव अशी सर्वच महत्त्वाची धरणे भरली आहेत. भीमा खोºयातील खडकवासला साखळीतील वरसगाव, पानशेत, खडकवासला, नीरादेवघर, भाटघर, डिंभे, माणिकडोह, पवना, भामाआसखेड, चासकमान या धरणातील पाणीसाठा चांगला आहे. तसेच सोलापूरची जीवनवाहिनी असलेले उजनी धरणही फुल भरले आहे. त्यामुळे सोलापुरचा पाण्याचा प्रश्न संपला आहे. पाऊस चांगला झाल्याने अडसाली उसाची लागवड देखील चांगली झाली आहे. राज्यात उसाचे सरासरी क्षेत्र ९ लाख ४ हजार ९७८ हेक्टर असून, त्यात खोडवा उसाचे प्रमाण ४० ते ४५ टक्के असते. यंदाच्या वर्षी ते ५० टक्क्यांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा कोल्हापूर आणि पुणे विभाग या ऊस क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने नवीन उसाचे क्षेत्र वाढले आहे. गेल्यावर्षी याच काळात १ लाख १३ हजार २९० हेक्टरवर नवीन उसाची लागवड झाली होती. यंदा त्यात २ लाख ४ हजार ६८ हेक्टर पर्यंत (८० टक्के अधिक) वाढ झाली आहे.
गेल्या हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदाच्या हंगामासाठी अतिरिक्त २.६० लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. परिणामी ऊस गाळप हंगामासाठी ९४१.६० लाख टन ऊस उपलब्ध होणार आहे. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणाºया उसाचे संपूर्ण गाळप व्हावे या साठी नोव्हेंबर ऐवजी १ आॅक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान २०१७-१८ या ऊस गाळप हंगामात ९५२.६२ लाख टन ऊस गाळपातून १०७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा ९४१ लाख टन ऊस गाळपातून १०६ ते १०७ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.