राज्यातील साखर हंगाम एक डिसेंबरपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 06:48 PM2019-11-04T18:48:37+5:302019-11-04T18:50:14+5:30
राज्यात सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे शेतात ओलावा असल्याने ऊस तोडणी लांबणीवर पडली आहे.
पुणे : सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे राज्यातील ऊस गाळप हंगाम तब्बल दोन महिना लांबणीवर पडला आहे. येत्या एक डिसेंबर पासून ऊस गाळप हंगाम सुरु होणार असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील अधिकाºयांनी दिली.
राज्यात सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे शेतात ओलावा असल्याने ऊस तोडणी लांबणीवर पडली आहे. साधारणपणे राज्यातील ऊस गाळप हंगाम १ आॅक्टोबरपासून सुरु होतो. तसेच, राज्यातील गाळप हंगामानेच देशातील ऊस गाळप हंगामाची सुरुवात होते. अजूनही राज्यातील ऊस पट्ट्यामधे पावसाची हजेरी आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत गाळप हंगाम लांबेल असे सांगण्यात येत आहे.
गेल्यावर्षी परतीच्या पावसाने दिलेली ओढ आणि यंदा अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झाल्याने गाळपासाठी केवळ ५७० लाख टन ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. तसेच, साखरेचे उत्पादन देखील ६० ते ६२ लाख टन होईल, असे सांगण्यात येत आहे. साखर आयुक्तालयाकडे ७० ते ७५ कारखान्यांचे परवाने तयार आहेत. येत्या दोन दिवसांत हे परवाने वितरीत करण्यात येतील, असे साखर आयुक्तालयातील अधिकाºयांनी सांगितले. राज्यात मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर गाळप हंगाम सुरु करण्यात येतो. अजूनही खातेवाटपाचा तिढा सुटला नसल्याने, हंगाम पुढच्या महिन्यात सुरु होऊ शकतो.
गेल्यावर्षी राज्यातील १०२ सहकारी आणि ९३ खासगी अशा १९५ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता. तसेच, ९५१.७९ लाख टन ऊस गाळपातून १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. सलग दुसºयावर्षी उच्चांकी साखर उत्पादनाची नोंद राज्यात झाली होती. यंदा कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या ऊस पट्ट्याला पुराच्या पाण्याचा फटका बसला. त्यातही कोल्हापूर आणि सांगली या ऊस पट्ट्यामधे पुराची तीव्रता अधिक होती. या भागातील ऊस पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. या परिणामामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन निम्म्यावर येईल, असे चित्र आहे.