साखर कामगारांची ‘दिवाळी’
By admin | Published: October 7, 2016 06:02 AM2016-10-07T06:02:45+5:302016-10-07T06:02:45+5:30
राज्यातील साखर कारखान्यांतील कामगारांना १५ टक्के वेतनवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील २0५ साखर कारखान्यांत काम करणाऱ्या दीड लाख साखर कामगारांची दिवाळी गोड होणार
प्रकाश पाटील, कोपार्डे (कोल्हापूर)
राज्यातील साखर कारखान्यांतील कामगारांना १५ टक्के वेतनवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील २0५ साखर कारखान्यांत काम करणाऱ्या दीड लाख साखर कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. ही वाढ आॅक्टोबरच्या पगारात देण्यात यावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर यांनी साखर कारखान्यांना दिले आहेत.
राज्यातील साखर कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या वेतन कराराची मुदत एप्रिल २0१४मध्ये संपली होती. त्यानंतर राज्य सरकारने शिवाजीराव गिरीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ८ जुलै २0१५ रोजी त्रिपक्षीय समितीची नेमणूक केली. समिती नियुक्त होऊनही वेतन कराराला विलंब होत असल्याने राज्य साखर कामगार संघटनेने २ जानेवारी २0१६ रोजी बेमुदत संपाचा इशारा दिला होता. मात्र, कारखान्यांचे गाळप हंगाम अडचणीत येणार असल्याने शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर ९०० रुपये हंगामी वेतनवाढ देण्यात आली. तसेच अंतिम वेतनवाढ दोन महिन्यांत मार्गी लावू, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने साखर कामगारांमध्ये असंतोषाला सुरुवात झाल्याने शरद पवार यांनी यामध्ये स्वत: लक्ष घालून त्याबाबत निर्णय घेण्याचे आदेश साखर आयुक्त व यंत्रणेला दिले.
साखर कामगारांना १ एप्रिल २0१४ रोजी असलेल्या वेतनश्रेणीत १५ टक्के पगारवाढ देण्यात येणार आहे. ४ जुलै २0१६ रोजीच्या करारातील कलम ३३मधील तरतुदीनुसार प्रत्येक साखर कारखाना आणि प्रतिनिधी व मान्यताप्राप्त युनियन यांनी त्यांना लागू असलेल्या मुंबई औद्योगिक संबंध कायदा १९४६च्या संबंधित तरतुदीनुसार वेतनवाढीचे करार करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
१ एप्रिल २0१४ रोजी साखर कामगारांना असलेल्या वेतनश्रेणीच्या आधारे १५ टक्के पगारवाढ देण्यात येणार आहे. या पगारवाढीत धुलाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, महागाई भत्ता इत्यादी वाढींचा समावेश राहील.
‘लोकमत’वर
अभिनंदनाचा वर्षाव
साखर कामगारांच्या वेतनवाढीबाबत ‘लोकमत’मधून सातत्याने पाठपुरावा होत होता. अलीकडेच ‘वेतन करार झाला; पण अंमलबाजावणी नाही’ या मथळ्याखालील वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत वेतन करार लागू करण्याचे आदेश निर्गमित झाल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कामगार वर्गातून ‘लोकमत’चे अभिनंदन केले जात आहे.गेली अडीच वर्षे साखर कामगारांचा वेतन करार रेंगाळला होता. ऐन दिवाळीच्या तोंडावर साखर आयुक्त पातळीवर हा करार लागू करण्याचे आदेश आल्याने साखर कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.
- सरदार पाटील, साखर कामगार प्रतिनिधी, कुंभी-कासारी