'मातोश्री'वरून अब्दुल सत्तारांना शांत राहण्याच्या सूचना ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 12:50 PM2020-01-08T12:50:07+5:302020-01-08T12:54:55+5:30
सत्तार यांचा आक्रमकपणा पाहता, त्यांना माध्यमांपासून दूर राहावे, अशा सूचना पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे समजते.
मुंबई - मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर शिवसेनेत असलेली नाराजी समोर आली होती. जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून नाराज झालेले मंत्री अब्दुल सत्तार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले होते. त्यानंतर औरंगाबादमधील शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. मात्र हा वाद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिटवला असून सत्तार यांना शांत राहण्याच्या सूचना मातोश्रीवरून मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
पक्षात निर्माण झालेला वाद पाहता औरंगाबादमधील नेते अब्दुल सत्तार, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांना मुंबईला बोलवून घेण्यात आले होते. यावेळी ठाकरे यांनी कठोर शब्दात नेत्यांची कानउघडणी केल्याचे समजते. पक्षांतर्गत वादामुळे औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेला नाचक्की सहन करावी लागली असती. मात्र ईश्वरी चिठ्ठीमुळे हे टळले.
नुकतेच पक्षात आलेल्या अब्दुल सत्तार यांच्याविषयी शिवसेनेत संताप निर्माण होऊ लागला. महाविकास आघाडी अस्तित्वात येत असताना देखील सत्तार माध्यमांसमोर आले होते. शिवसेनेच्या आमदारांना देण्यात आलेल्या सूचना ते माध्यमांना सांगत होते. पक्षाचे प्रवक्ते असल्याप्रमाणे सत्तार माध्यमांशी बोलत होते. त्याचवेळी त्यांना पक्षाकडून समज दिल्याची चर्चा होती.
दरम्यान सत्तार पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. तर आपल्या राजीनाम्याच्या अफवा असल्याचे सांगत सत्तार यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्तार यांचा आक्रमकपणा पाहता, त्यांना माध्यमांपासून दूर राहावे, अशा सूचना पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे समजते.